

मुंबई- “उद्धव ठाकरे Uddhav Thackeray तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे, अशी टीका तुम्हीच केली होती. पण आता 22 जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे”, असा पलटवार आज भाजपने उद्धव ठाकरेंवर केला.
पाच राज्यांच्या निकालात भाजपाला घवघवीत यश मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले. आता पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या असल्याने दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे आव्हान ठाकरेंनी भाजपला दिले. सरकारला आणि गौतम अदानी यांना जाब विचारण्यासाठी १६ डिसेंबरला धारावीहून अदानींच्या कार्यालायावर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपने प्रत्युत्तर दिले. “कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका. उद्धव ठाकरे किती रडारड करणार?” असा सवालही भाजपने केला आहे.