सारं काही आपलंच कसं?

0

 

अगदी समज आल्यापासून आपल्या हातातलं हे केवळ आपलंच आहे हा स्वभाव सहजपणे तयार होत नाही. हा स्वभाव तयार व्हायला सभोवतालचं वातावरण, बाल्यावस्थेतील अनुभव, संस्कार अशी अनेक कारणे प्रामुख्याने लक्षात येतात. हा स्वभाव कालांतराने वृत्ती बनते. ह्या वृत्तीमुळे कामना आणि वासना वाढत जाते आणि त्यानंतर आपल्याला आवडणारं, आपलं नसलं तरीही, केवळ आणि केवळ आपलंच आहे हा हक्क दाखवायला सुरवात होते.

अर्थात प्रत्येकचजण ह्या वृत्तीचा असतो असं नाही म्हणता येणार. काहीजण आपलं असूनही ते आपलं नाहीच ह्या वृत्तीचेही असतात. यालाच निरीच्छ वृत्ती असं म्हटल्या जातं. ह्यामध्ये कामना आणि वासना ह्या दूर गेलेल्या असतात. लोभ आणि मोहाच्या पलिकडे गेलेली वृत्ती ही केवळ संत आणि महात्म्याचीच असते असेही नाही म्हणता येणार. एखादा सामान्यातला सामान्यही ह्या वृत्तीने जगत असताना आपण बघतो.

आवश्यकता आणि गरज ह्यापलिकडे जेव्हा आपण विचार करायला लागतो, त्यानुसार आपले वर्तन असते तेव्हा लोभ आणि लालसा ह्या चोरपावलाने आपल्या आंत कधी घर करून जातात हे कळतही नाही.

आपलं हे तर आपलंच आहे परंतु आपल्याला आवडलेलं हे दुसऱ्याचं असूनही तेही आपलंच आहे आणि ते आपलं होत नसेल तर ते कसंही करुन आपलं कसं करता येईल ही वृत्ती जेव्हा वाढीस लागते ना तेव्हा आपल्यात खलप्रवृत्ती निर्माण होऊन आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी सुरु होते. दुसऱ्याचं मिळवायला यशस्वी झालो की परमानंद होतो आणि ह्याउलट ते मिळवू शकलो नाही की अस्वस्थता येते, निद्रानाश होतो, नैराश्यही येते.

काही व्यक्ती मात्र आपल्याजवळचं सारंकाही आपलं नसल्याप्रमाणेच वागत असतात आणि त्याच वृत्तीने जगत असतात. एवढेच नव्हे तर एखाद्याला त्यांच्याजवळचे पाहीजे असेल तर कुठल्याही आढेवेढ्याविना, सहजतेने ते त्याच्या स्वाधीन करायला तयार होतात. जे आपले नाही त्यावर आपला हक्क नाही आणि जे आपले आहे त्यावर हक्क दाखवावा हा स्वभाव अथवा वृत्तीही नाही हा व्यक्तीमत्वाचा केवळ सच्चेपणा आणि साधेपणा नाही म्हणता येणार तर तो थोरपणाच म्हणावा लागेल.

खरंतर आपलं नाही ते आपलं करण्याचा प्रयत्न म्हणजे ओरबाडणंच नव्हे काय? ह्या आपल्या स्वभाव अथवा वृत्तीमुळे आपण आपल्या समाधानाच्या कक्षा जरी वाढवत असलो तरी ह्या आपल्या असूरी वृत्तीमुळी आपण इतरांवर अन्याय करतो, त्याला वेदना देतो, नव्हे आपल्याबद्दल समोरच्यांच्या मनातील सद्भावना आपल्याच पायाने तुडवून टाकतो. हा आपणच आपण स्वत:चा केलेला अनादरच नाही काय? बरं हे सारं केल्यानंतरही मिळवलेलं सारं किती दिवस टिकणार असतं. आपलं येणंही आपल्या हातात नाही आणि जाणंही. मग ह्या येण्या-जाण्याच्या अनिश्चिततेच्या काळात किती आपलं आपलं करीत जगायचं. जे आपलं आहे तेही आपल्यासोबत कायम नसणार, आपल्यासोबत नेताही येणार‌ नाही परंतु त्यासाठी आयुष्याच्या छोट्याशा काळात ते किती वेळ छातीशी धरून जगायचं आणि इतरांचं ओरबाडत राहायचं?

ह्याविषयी एका हिंदी भजनाच्या काही ओळी आठवतात त्या अशा –

क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा
दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला

इस जगत सरायें में, मुसाफिर दो दिनका
क्यों व्यर्थ करे गुमान, मुरख धन दौलत का
बंद मुठ्ठी आया जग में, खाली हाथ जाएगा
दो दिन की जिंदगी है, दो दिनका मेला

मित्रांनो, सारंकाही आपलं कधीच नसतं तर जे आपलं वाटत असतं ना ते सारंकाही ‘त्याचं’ असतं आणि ‘त्याचं’ असण्यावर आपण कसा काय आपला हक्क दाखवायचा, होय ना?

मधुसूदन (मदन) पुराणिक
9420054444