
अमरावती- केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात वाहन चालकांसाठी कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. याविरोधात आज अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्याच्या तहसील कार्यालयावर चालक वाहक संघटनेच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. हा कायदा मागे घेण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्यांचे चालक वाहक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. 10 वर्ष कारावास किंवा 7 लक्ष दंडाची तरतुद केल्यामुळे चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वाहन चालविण्यास चालक भयभित होत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येवू शकते, असे सांगण्यात आले. या सर्व बाबींचा विचार करुन सदरचा कायदा केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बोरी अडगाव येथील शेतकरी विविध मागण्यांसाठी आक्रमक
बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. टीएमसी मार्केट जवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. शेतकरी सर्वच ट्रॅक्टर घेऊन उपविभागीय कार्यालयावर घेऊन जाण्यावर ठाम असल्यामुळे, संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावरचं ठाण मांडून आंदोलन सुरू केले. तीन तासानंतर शेतकऱ्यांनी सावरती भूमिका घेत तीन ट्रॅक्टर घेऊन उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकारी रामेश्वर पुरी यांना देण्यात आले.त्यानंतर उपोषणकर्ते बुलढाणा येथे जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चेसाठी रवाना झाले. जिल्हाधिकारी यांच्या चर्चेनंतर जर तोडगा निघाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
पेट्रोल, डिझेल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
अमरावती- केंद्राच्या मोटार वाहन कायद्याविरोधात राज्यातील ट्रक आणि टँकर चालकांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारल्याने अमरावती जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल पोहोचले नाही. त्यामुळे मध्यरात्रीपासून 90 टक्के पंप ‘ड्राय’ झाले आहेत. पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून तर आज दुसऱ्या दिवशी देखील
वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेल साठी वाहनचालकांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागल्याने संताप व्यक्त होत असून सरकारने तातडीने उपाययोजना राबवण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. त्या सोबतचं सामान्य नागरिकांनी शासन प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.
हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ड्रायव्हर संघटनेच्या वतीने चक्काजाम
वर्धा – वर्ध्यातील ड्रायव्हर संघटनेच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले . केंद्र सरकारने काढलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले असून हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत संप चालू राहील असा इशारा वाहनचालकांनी दिली आहे. यावेळी वाहनचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या भूमिकेवर आंदोलक ठाम असून, लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा अशी विनंती वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.
ट्रान्सपोर्टनगरमध्ये ट्रक चालकांचा संप
अमरावती- सरकारच्या नवीन कायद्याच्या विरोधात काल रात्रीपासून ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे. अमरावती जिल्ह्यात पाच हजाराच्या वर ट्रक चालक या संपात सहभागी झालेले आहेत. अमरावतीच्या ट्रान्सपोर्ट नगर येथील पार्किंग मध्ये एक हजाराच्या वर ट्रक रात्रीपासून थांबून आहेत. केंद्र सरकारने हा कायदा वापस घ्यावा अशी या वाहनचालकांची मागणी आहे. या संपाचा परिणाम आता जीवनावश्यक वस्तूवर देखील व्हायला लागलेला आहे.
नव्या कायद्याविरोधात चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे रास्ता रोको
बुलढाणा – केंद्र सरकारने चालकाविरुद्ध तयार केलेल्या कायद्याविरोधात संपूर्ण देशात विरोध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज चालक-मालक संघटनेकडून बुलढाण्यात देखील आंदोलन करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौक येथे वाहनांच्या चालक-मालकांनी एकत्र होत, रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. बुलढाणा-परतवाडा या एसटी बस समोर दुचाकी टाकून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी एसटी बस समोर टाकलेली दुचाकी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. यात दोन चालकांना ताब्यात घेतले आहे. केंद्राने केलेला कायदा रद्द नाही केला, तर आज शांततेत आंदोलन करतोय, उद्या उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा चालक-मालक वाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश मुंगळे यांनी सरकारला दिला आहे.
ट्रक चालकांच्या संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका
गोंदिया – केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायद्यामुळे वाहन चालकांना नवीन अटी लावल्याने याचा विरोध राज्यात सर्वत्र होत आहे. चालकांनी बंद पुकारल्याने ठिकठिकाणी वाहतूक थांबली आहे. याचाचं फटका आता गोंदिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील बसला आहे. रोज या ठिकाणी 100 च्या वर मोठे ट्रक भाजीपाला इतर राज्यातून घेऊन येत होते. मात्र, कालपासून वाहन चालकांनी केंद्र सरकारच्या नवीन कायद्याच्या विरोधात बंद पुकारला आहे. गोंदियाच्या बाजार पेठेत भाजीपाला उपलब्ध झाला नसल्याने शिळा भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. तर भाजी उपलब्ध होत नसल्याने भाज्यांचे दर देखील दुप्पट होत दर वाढले आहेत. जे ट्रक चालक इतर राज्यातून बटाटे, कांदे, अद्रक असे साहित्य घेऊन आले आहेत, त्यांच्या मालकाने देखील त्यांना त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना ट्रक दिल्या आहेत.