ऐतिहासिक निर्णय: ज्ञानवापीच्या तळघरात हिंदूंना पूजेचे अधिकार

0

 

(Varanasi)वाराणसी: येथील ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाला मोठा विजय मिळालेला आहे. कनिष्ठ न्यायालयाने हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे. मागील ३१ वर्षापासून या तळघरातील पूजा बंद होती. स्थानिक व्यास परिवाराकडे या पूजेचे अधिकार होते. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे ते पुन्हा बहाल झालेले आहेत. दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशावर मुस्लिम पक्ष उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९९३ मध्ये तत्कालीन मुलायम सिंह सरकारने तळघरातील पूजा थांबविली होती. त्यानंतर मागील ३१ वर्षापासून पूजा बंदच होती व ती पुन्हा सुरू करण्यासाठी हिंदू पक्षाचे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना आज यश आले.

ज्ञानवापीच्या तळघरात पूजेची परवानगी देताना न्यायालयाने स्थानिक प्रशासनाला सात दिवसात या संदर्भातील व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्ञानवापीचा ASI सर्वेक्षण अहवाल २५ जानेवारी रोजी सार्वजनिक करण्यात आला. या अहवालानुसार, संकुलात भगवान विष्णू, गणेश आणि शिवलिंगाच्या मूर्ती सापडल्या आहेत. संपूर्ण संकुलप्राचीन मंदिराच्या रचनेवर उभे असल्याचे ३४ पुरावे नमूद करण्यात आले आहेत. मशीद संकुलाच्या आत ‘महामुक्ती मंडप’ नावाचा दगडी स्लॅबही सापडला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने आपल्या अहवालात नमूद केले की, ज्ञानवापीमध्ये एक मोठे हिंदू मंदिर होते. १७ व्या शतकात औरंगजेबाच्या राजवटीत मंदिर पाडण्यात आले.

ज्ञानवापीच्या भिंतींवर आणि दगडी पाट्यांवर चार भाषांचा उल्लेख आढळून आला. त्यात देवनागरी, कन्नड, तेलगू आणि ग्रंथभाषांचा समावेश आहे. याशिवाय भगवान शंकराची 3 नावेही सापडली आहेत. सर्व खांब पहिल्या मंदिराचे होते, जे सुधारित करून पुन्हा वापरले गेले. संकुलाच्या विद्यमान संरचनेत सजवलेल्या कमानींच्या खालच्या टोकाला कोरलेल्या प्राण्यांच्या आकृत्या विद्रूप झाल्या आहेत. घुमटाचा आतील भाग भौमितिक रचनांनी सजलेला आहे. मंदिराच्या मध्यवर्ती गाभाऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडून होते. हा दरवाजा प्राणी आणि पक्ष्यांच्या कोरीव कामांनी आणि सजावटीच्या कमानीने सजवलेला होता. ज्ञानवापीच्या पश्चिमेकडील भागात हिंदू मंदिराची प्राचीन भिंत स्पष्ट दिसत असल्याचेही पुरातत्त्व विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.