

आयसीएआय, आयसीएसआय आणि आयसीएमएआय नागपूर शाखांचा सहभाग
नागपूर(Nagpur), २५ जून २०२५-इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) नागपूर शाखेच्यावतीने बुधवारी धंतोली येथील आयसीएआय भवन येथे “भारताचा आर्थिक विकासाचा दशक : आतापर्यंतचा प्रवास” या विषयावर पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले. यात आयसीएआय, आयसीएसआय आणि आयसीएमएआय या नागपुरातील तीन प्रमुख वित्तीय संस्थांच्या पदाधिका-यांनी सहभाग घेतला. भाजप महाराष्ट्र आर्थिक सेलचे अध्यक्ष सीए मिलिंद कानडे यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आयसीएआय नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए दिनेश राठी, आयसीएमएआयचे अध्यक्ष सीएमए रजत नायडू आणि आयसीएसआयचे सदस्य सीएस कुशल बजाज यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सीए दिनेश राठी स्वागतपर भाषणातून तिन्ही वित्तीय संस्थांमधील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या दशकात भारताचा जीडीपी जवळपास दुप्पट झाला असून हे यश सक्षम आर्थिक धोरणे व धोरणात्मक संरचनात्मक सुधारणा यांचे फलित असल्याचे ते म्हणाले. या संयुक्त उपक्रमासाठी तीनही संस्थांना एका मंचावर आणल्याबद्दल त्यांनी सीए मिलिंद कानडे यांचे विशेष कौतुक केले.
सीएमए रजत नायडू यांनी तांत्रिक प्रगतीमुळे आणि चालू आर्थिक सुधारणांमुळे वित्तीय व्यावसायिकांची भूमिका अधिक व्यापक व परिणामकारक कशी झाली आहे, यावर विचार व्यक्त केले. तर सीएस कुशल बजाज यांनी डिजिटायझेशन, नवोपक्रम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा जागतिक स्तरावर भारताच्या आर्थिक दर्जावाढीत झालेला प्रभाव अधोरेखित केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए स्वरूपा वझलवार यांनी केले तर आभार सीए दीपक जेठानी यांनी मानले.
त्यानंतर झालेल्या पॅनेल चर्चेत सीए स्वस्तिक जैन, सीएमए कमल कोठारी आणि सीएस खुशबू पसारी यांनी भाग घेतला. जीएसटी लागू झाल्यानंतर अनुपालनातून विकास कसा साधता येईल, ऑटोमेशनचे महत्त्व आणि डेटा-आधारित निर्णयप्रक्रियेचा प्रभाव यावर त्यांनी प्रकाश टाकला. येणाऱ्या दशकात वित्तीय व्यावसायिक केवळ अनुपालन तज्ज्ञ न राहता, उद्योगांच्या धोरणात्मक भागीदाराच्या भूमिकेत दिसतील, असा सूर त्यांनी व्यक्त केला. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन सीए प्रेमलता साबू यांनी केले.