हिंगणा वन विभागाची बेजबाबदारी: रानडुक्करच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, मदत देण्यास नकार

0

नागपूर, ता. २४ ऑगस्ट २०२४: हिंगणा रोडवरील बायपास पुलाजवळ रानडुक्करच्या अचानक रस्त्यावर येण्यामुळे दुचाकीस्वार धर्मपाल वाघमारे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हिंगणा वन विभागाची बेजबाबदारी उघडकीला आली आहे.

४९ वर्षीय धर्मपाल वाघमारे हे सुकळी (कलार) येथे किराणा दुकान चालवायचे. २० ऑगस्ट रोजी ते हिंगण्यापासून कलारला जात असताना दुपारी साढे चार वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेचे साक्षीदार पवन याने पोलिसांना माहिती दिली. धर्मपाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचाही काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा हिमांशू आता एकटाच राहिला आहे.

हिमांशूने सांगितले की, वन विभागाला या घटनेची माहिती दिली असता, त्यांनी ४८ तासांच्या आत माहिती दिली नाही म्हणून मदत करण्यास नकार दिला. पोलिसांनी वन विभागाला प्रत्यक्षदर्शीचे बयान दिले असूनही, वन विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही.

वन विभागाला दुर्घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने मदत करण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. पण, बायपासवर सीसीटीव्ही नसल्याचा दोष हिमांशूचा कसा? प्रत्यक्षदर्शीचे बयान का विचारात घेतले जात नाही? वन विभाग आणि राज्य शासन प्राणीमुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी मदत देण्याची घोषणा करतात, पण या प्रकरणात ही मदत का मिळत नाही? वन विभागाचे नियम इतके कठोर का आहेत?

शवविच्छेदन अहवालात रानडुक्करच्या धडकेमुळे मृत्यू झाला हे सिद्ध झाल्यासच मदत मिळेल, असे वन विभागाचे म्हणणे आहे. पण, शवविच्छेदन अहवालात इतके तपशीलवार माहिती कशी मिळेल?

या प्रकरणात वनमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे न्याय मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा निषेध केला आहे.