
नवी दिल्ली(New Delhi), २१ जून :- दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांच्या जामीनाला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामिनावर स्थगिती राहील, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने काल (गुरुवार) केजरीवाल यांना नियमित जामीन मंजूर केला होता, मात्र आज (शुक्रवार) ईडीने केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेतली. तसेच, या खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही, असे सांगितले. म्हणजे जामीन मिळूनही केजरीवाल यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.
उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना ईडीने असा युक्तिवाद केला की, आम्हाला कनिष्ठ न्यायालयात आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नाही. तर यावर उत्तर देताना केजरीवाल यांच्या वकिलाने ईडीचा हा दावा फेटाळून लावला.
काय आहे आरोप?
दिल्ली मद्य धोरणातील अनियमिततेचे मुख्य सूत्रधार अरविंद केजरीवाल असल्याचा दावा ईडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणात ‘आप’चे इतर अनेक नेतेही सहभागी झाले आहेत. ‘आप’ने हे आरोप फेटाळूून लावत हे सर्व राजकीय सूडबुद्धीच्या भावनेतून होत आहे. पण लोक आमच्यासोबत आहेत. अशी प्रतिक्रिया आपच्या नेत्या आतिशी आणि इतर नेत्यांनी केली आहे.