महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

0

मुंबई, 27 नोव्हेंबर : राज्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झालेय. कांदा, कापूस,मका, द्राक्ष इत्यादी पिकांची नासाडी झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेलाय. दरम्यान परभणीत पूर्णा नदीला पूर आला असून सर्वत्र शेतात पाणी साचल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. Heavy crop damage due to unseasonal rains in Maharashtra

उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात रविवारी रात्री मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. राज्यातील बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पाऊस, गारपिटीचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

हवामान खात्याने येत्या 24 तासांत महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात मुसळधार पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याबाबत हवामानतज्ज्ञांनी सांगितले की, पूर्व व पश्चिम वारा प्रणालींच्या संयोगातून गारपिटीची शक्यता अधिक वाढली आहे. अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत पश्चिम किनारपट्टी समांतर दीड किलोमीटर उंचीचा हवेच्या कमी दाबाच्या आस तयार झाला आहे. तसेच चक्रवातामुळे गुजरातपासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचे वातावरण आहे. राज्यातील ढगाळ वातावरण 30 नोव्हेंबरनंतर निवळणार असून त्यानंतर थंडीचा कडाका वाढणार असण्याची शक्यता आहे.