मराठा आरक्षणाच्या याचिकेवर २४ जानेवारीला सुनावणी

0

नवी दिल्ली: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation Issue) देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने क्यूरेटीव्ह याचिका स्वीकारल्यावर आता त्यावर २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज यासंदर्भातील माहिती पुढे आली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा समाजाला जात आहे.
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी माहिती दिली की, क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने भाष्य करताना २४ जानेवारीला सुनावणीसाठी ठेवली आहे. याच अर्थ असा की, सर्वोच्च न्यायालयाने ती स्वीकारली आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल, असा विश्वास आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन-चेंबर ही सुनावणी पार पडली होती. क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.