

नवी दिल्ली(New Delhi), 09 जुलै :- उत्तरप्रदेशच्या हाथरस येथील चेंगराचेंगरी प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याप्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून सरन्यामूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सदर याचिकेवर सुनावणी करण्यास स्वीकृती दिलीय. गेल्या2 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 121 लोकांचा मृत्यू झाला होता.
याचिकेनुसार चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.उत्तर प्रदेश सरकारने 2 जुलै रोजी घडलेल्या घटनेचा अहवाल तयार करावा आणि निष्काळजीपणासाठी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
हाथरस जिल्ह्यातील फुलराई गावात भोले बाबांच्या सत्संगाला 2.5 लाखांहून अधिक
भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये महिला आणि लहान मुले आहेत.
या सत्संगाला राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणासह अनेक राज्यातून लोक आले होते. वाहनांची संख्या तीन किलोमीटरवर पसरली होती यावरून गर्दीचा अंदाज लावता येतो असेही याचिकेत नमूद केलेय.