

‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज
टी-२० विश्वचषक २०२४ मधील १९व्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ धावांनी रोमहर्षक पराभव केला. दमछाक करणाऱ्या या सामन्याचा निकाल शेवटच्या षटकात लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाकिस्तानी संघाला १२० धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर पाकिस्तानी संघ २० षटकांत ७ बाद केवळ ११३ धावा करू शकला. या सामन्यात हार्दिक पंड्याने जसप्रीत बुमराहला शानदार साथ दिली. या दरम्यान हार्दिक पंड्याने दोन विकेट्स घेत पाकिस्तानविरुद्ध एक मोठा विक्रम केला आहे.
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (All-rounder Hardik Pandya) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ४ षटके टाकली आणि २४ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. यासह तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. हार्दिक सर्व भारतीय गोलंदाजांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आतापर्यंत त्याने पाकिस्तानविरुद्ध टी-२० सामन्यात एकूण १३ विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार आहे. त्याच्या नावावर ११ विकेट्स आहेत. भारतीय संघाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पाकिस्तान संघाविरुद्ध ७ विकेट्स घेतल्या आहेत.