
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक घोटाळ्यात दोषी आढळलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात आली आहे. काल न्यायालयाने त्यांना या घोटाळ्यात पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे केदार यांच्यापुढे हे राजकीय संकट निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.
सुमारे दिडशे कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यात न्यायालयाने त्यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणत्याही खटल्यात दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. केदार यांना झालेल्या शिक्षेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. अर्थात यासंबंधीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यावा लागणार आहे. आता नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केदार यांच्या वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागण्याची तयारी सुरु केली आहे. न्यायालयात शिक्षेला स्थगिती तसेच आव्हान देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काल रात्री केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोकेदुखी व छातीत दुखत असल्याच्या त्यांच्या तक्रारीच्या आधारे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी काढला असल्याची माहिती आहे.