

हाजी शेख हत्या प्रकरणात ६ आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी
चंद्रपूर (Chandrapur), 14 ऑगस्ट कोळसा तस्करीत डॉन समजल्या जाणाऱ्या कुख्यात हाजी शेख हत्या प्रकरणात (In the Haji Shaikh murder case)मंगळवारी सकाळी सुरेंद्र यादव या आरोपीला नागपुरातून अटक करण्यात आल्याने प्रकरणातील आरोपींची संख्या सहावर पोहचली आहे. दरम्यान ६ आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. कुख्यात हाजी शेख वर सोमवारी दुपारी शहरातील एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना आरोपींनी गोळ्या झाडल्या.
सोबतच चाकूने देखील सपासप वार केले. गंभीर अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सोमवारी सायंकाळपर्यंत मुख्य आरोपी समीर शेखसह राजेश मुलकलवार, प्रशांत उर्फ पशी मालवीनी, निलेश उर्फ पिंटू ढगे, श्रीकांत कदम या ५ आरोपींना अटक केली होती. आणखी एक आरोपी सुरेंद्र यादव याला मंगळवारी सकाळी नागपुरातून अटक करण्यात आल्याने यातील आरोपींची संख्या सहा झाली.
सहाही आरोपींना चंद्रपूर प्रथम श्रेणी न्यायालयात पेश केले असता समीर शेखसह सर्वांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलीस सर्व कोनाने तपास करीत असून सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहत असल्याची पुष्टी सूत्रांनी जोडली. यात आणखी आरोपी असू शकतील अशीही शक्यता वर्तविली जात आहे.