

चंद्रपूर, (प्रतिनिधी): चंद्रपुरातील बिनबागेट येथील शाही दरबार हॉटेलमध्ये आज दुपारी भरदिवसा हाजी अली यांच्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, हाजी अली जेवण करत असताना पाच ते सहा सशस्त्र व्यक्तींनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला.
हाजी शेख हा हत्या, खंडणी आणि कोळसा चोरीसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी होता. त्याच्यावर चंद्रपूरसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल होते. गडचांदूरमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या घरावर त्याच्या गँगने केलेल्या गोळीबाराच्या प्रकरणात तो होता. आज त्याच्यावर गोळीबार झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. हाजी अलीच्या अवस्थेबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. या घटनेमुळे चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.