“ठाकरेंनी सल्ला दिला असता तर पाळला असता…” आंबेडकरांचा संजय राऊतांवर पलटवार

0

मुंबई : “सांभाळून बोला हा सल्ला ठाकरेंनी दिला असता तर पाळला असता…” या शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना (Prakash Ambedkar Reply to Sanjay Raut) प्रत्युत्तर दिले. आजच संजय राऊत यांनी आंबेडकरांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यावर आंबेडकरांनी पलटवार करीत अप्रत्यक्षपणे राऊत यांना सुनावले आहे. आंबेडकरांनी पवारांवर केलेल्या टिकेवरून वाद निर्माण झालाय. या वादात राऊत यांनी शरद पवारांची बाजू घेत आंबेडकरांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला होता, हे विशेष. संजय राऊतांना प्रत्युत्तर देतानाच प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझे पवारांबाबतील वक्तव्य  भूतकाळातील अनुभवावरुन आहे. आमची युती शिवसेनेसोबत आहे व उद्धव ठाकरे आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यास प्रयत्नशील आहेत.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजप जेव्हा जिंकत नाही तेव्हा ते भांडण लावण्याचे काम करतात. त्यामुळे भाजप कोणत्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचा शस्त्रू नाही. टोकाचे मतभेद आम्ही अनेकवेळा मांडले आहेत. भाजपचे आणि आमचे टोकाचे मतभेद आहेत. वैयक्तिक वाद नाही, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?
“आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांबाबत अशी वक्तव्ये करणे आम्हाला अजिबात मान्य नाही. विशेषतः पवारांवरील आरोप आम्हाला मान्य नाही. त्यांनी शब्दांचा जपून वापर करावा” असा सल्ला संजय राऊतांनी आंबेडकरांना दिलाय. पवारांवर असे आरोप करणे म्हणजे त्यांच्या कारकीर्दीवर आरोप करण्यासारखे आहे. ते भाजपचे असते तर अडीच वर्षापूर्वी भाजपचे सरकार दूर ठेवून शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार येऊच दिले नसते, असा युक्तिवाद राऊतांनी केलाय. पवारांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला व आजही विरोधकांच्या एकीचा विचार करतो, तेव्हा पवारांचे नाव प्रामुख्याने घेतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी जपून शब्द वापरावे, असा सल्लाही त्यांनी दिला.