अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतला आढावा

0

 

फिल्डवर जाऊन तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना

वर्धा (Wardha):- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा दुरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. जिल्ह्यात आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते व काही भागांमध्ये पुलांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांचे फिल्डवर जाऊन तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागाचे अधिकारी या बैठकीला दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी वान्मथी सी., अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे आदी उपस्थित होते.

नुकसानग्रस्त रस्त्याच्या जागी पर्यायी मार्ग तयार करण्याचे निर्देश

दिनांक 13 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. यात जिल्हाभर ठिकठिकाणी शेती, शेत पिके व घरांचे नुकसान झाले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना माहिती दिली. सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तत्काळ पंचनामे करुन प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी यावेळी केल्या.

या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात रस्त्यांचे व पुलांचे नुकसान झाले आहे. त्याठिकाणी पर्यायी रस्त्यांचे काम सुरू करा. काही भागात विहीर खचल्या, लाईनचे पोल जमीनदोस्त झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी (Dr.Pankaj Bhoyar) दिल्या.

जुन व जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे अंतिम प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठवावा, शासनाकडे निधीबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असेही पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले. यावेळी आ. समीर कुणावार आ.राजेश बकाने यांनीही मतदार संघात झालेल्या नुकसानीबाबत मदत करण्याचे सूचना तहसीलदारांना दिल्या.