‘अॅग्रोव्हिजन २०२५’ प्रदर्शन स्थळाचे भूमिपूजन संपन्न

0

अॅग्रोव्हिजन प्रदर्शनातील नवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा राज्यमंत्री पंकज भोयर

नागपूर, २ नोव्हेंबर २०२५: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात येत्या, २१ ते २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या १६ व्या अॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा आणि परिषद स्थळाचे भूमिपूजन गृह, शिक्षण, गृहनिर्माण, सहकार राज्यमंत्री मा. श्री. पंकज भोयर यांच्या हस्ते रविवारी २ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडले,

अॅग्रोव्हिजन हे शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती आणि कृषि संशोधनाची माहिती मिळविण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. सर्व शेतकन्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन शिकावे, नवीन टेक्नॉलॉजीचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीत त्याचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.

या कार्यक्रमाला अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, आयोजन सचिव श्री रवी बोरटकर, श्री रमेश मानकर, कुलगुरू माफसू श्री नितीन पाटील, अॅग्रोव्हिजन फाउंडेशन चे सदस्य, श्री सुधीर दिवे, श्री विजय जाधव, कॅप्टन एल. बी. कलंत्री, श्री समय बनसोड, डॉ सुनील साहतपुरे, श्री मनोज जवंजाळ, श्री आनंद बाबू कदम, श्री राम मुंजे, डॉक्टर हितेंद्र सिंग, श्री नितीन कुलकर्णी, श्री प्रशांत वासाडे, पीकेव्ही चे श्री विजय इलोरकर, श्री विनोद राऊत व माजी नगरसेविका श्रीमती परिणीता फुके, माजी पंचायत समिती सदस्य श्रीमती वैशाली रेवतकर नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे, श्री. गारवे, श्री साहू आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार श्री भोयर यांनी कुदळ मारून व नारळ फोडून विधीवत पूजा करून भूमिपूजन केले.

कृषी प्रदर्शन, कार्यशाळा व परिषदा :

अॅग्रोव्हिजन २०२५’ हे मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असून यात शेतीविषयक विषयांवर कार्यशाळा व परिषदांचेही आयोजन करण्यात येणार आहे. मागील वर्षांप्रमाणेच यंदाही या प्रदर्शनाला देशभरातील सुमारे २ लाखांपेक्षा अधिक शेतकरी, कृषी तज्ज्ञ, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. श्री रवी बोरटकर यांनी सांगितले की, या वर्षी अंदाजे १२,००० चौरस मीटर क्षेत्रात प्रदर्शनाचे हँगर्स, मोठ्या यंत्रांसाठी स्टॉल्स उभारले जातील. कार्यशाळांसाठी तीन हॉल तसेच परिषदेसाठी देखील एक हॉल राहणार आहे. सुमारे ४५० हून अधिक नामांकित कंपन्या ओणि कृषी संस्थांचा यावर्षी सहभाग निश्चित झाला आहे.

प्रमुख कंपन्या व संस्थांचा सहभाग :

या वर्षी मोठ्या कंपन्यांमध्ये UPL, TAFE, Kubota, महिंद्रा ट्रॅक्टर्स, सोनालिका, John Deere, अंकूर सीड्स, अजित सिड्स, महाबीज, रासी सीड्स, महिका सीड्स, या सारख्या बियाणे आणि इतर ट्रॅक्टर कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. BKT Tyres, ITC, धनुका, क्रिस्टल क्रॉप केअर, सल्फर मिल्स, पारिजात इंडस्ट्रीज, टाटा अॅग्रीको, प्लास्टो, तसेच, सौर क्षेत्रातील कंपन्या आयसीएआर लॅब, बँकींग संस्था-सिडबी, एसबीआय, नाबार्ड तसेच आयआयटी खरगपूर,

पीडीकेव्ही अकोला यासारख्या शैक्षणिक संस्थांचादेखील सहभाग राहणार आहे. MSME innovators / नवोन्मेषक यांच्यासाठी स्वतंत्र पॅव्हेलियन देखील तयार करण्यात येणार असून, यात सवलतीच्या दरात स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. MSME साठी येत्या १० नोव्हेंबरपर्यंत स्टॉल बुकिंग करता येणार आहे अशी माहिती श्री रवी बोरटकर यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी ३० कार्यशाळा :

अॅग्रोव्हिजन २०२५ मध्ये शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादन, दुग्धव्यवसाय, शेतकरी उत्पादक संघटना (FPO), शेतीत AI आणि मशीन लर्निंगचा वापर, विषयांवरील दीर्घकालीन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय इतर अनेक महत्वाच्या विषयांवर कार्यशाळा आयोजित होणार आहे. सुमारे ६० कृषितज्ञ शेतकऱ्यांना, मार्गदतशन करतील, मध्य भारतात अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठ्या संधि आहेत. या विषयी माहिती देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगावर परिषदेचे आयोजन करणायात आले आहे.

मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ओळखते जाणारे १६ वे अॅग्रोव्हिजन २१ ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी व प्रदर्शनाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोव्हिजन सचिवालय, गोविंद अपार्टमेंट, शंकरनगर, नागपूर येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५५५२४९ / २५४४९२९ वर संपर्क साधावा.