महाकवी कालिदास दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

0

महाकवी कालिदास

कालिदासांचा जन्म एका ब्राह्मण कुळात झाला. दुर्दैवाने कालिदास लहान असतानाच त्यांच्या वरील माता-पित्याचे छत्र हरपले. कालिदास सुरूप, सुदृढ आणि बुद्धिमान होते. त्यांचा प्रतिपाळ एका गवळ्याने केला. या गवळ्याच्या घरावर सरस्वतीची कृपा नव्हती. त्यामुळे कालिदासांवर विद्येचे संस्कार होऊ शकले नाहीत. कालिदास तरुण झाले तरी त्यांची बुद्धिमत्ता वाढलेली नव्हती.

जवळच्या नगरीतील एका राजकन्येचे लग्न तेथील प्रधानाने कपट करून या देखण्या परंतु विद्याहीन तरुणाशी लावून दिले. लग्नानंतर राजकन्येच्या ध्यानात आले की आपला पती पूर्णपणे अशिक्षित आहे. तसेच त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची बुद्धिमत्ता नाही. म्हणून तिने आपल्या पतीला कालीदेवीच्या उपासनेने विद्वत्ता संपादन करण्यासाठी पाठवले. कालिदासांनी भक्तीपूर्वक आणि निष्ठेने कालीदेवीची उपासना केली. त्यामुळे कवित्व, विद्वत्व कालिदासांना प्राप्त झाले.

विद्यासंपन्न होऊन कालिदास घरी परतले. आपला पती परत आल्यानंतर त्याने काही विद्या संपादन केली आहे का हे जाणून घेण्यासाठी पत्नीने त्यांना विचारले, “आता तुझ्यात काही विशेष गुण आले आहेत का?”

आपल्या पत्नीच्या या प्रश्नाला उत्तर देताना कालिदासांनी कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंश अशी तीन काव्य उत्तरा दाखल धडाधड म्हणून दाखवली. पत्नीच्या मार्गदर्शनामुळे आपण कालीमातेची उपासना करून विद्या संपादन केली, कवित्व शक्ती प्राप्त करून घेतली त्यामुळे पत्नी विषयीची त्यांच्या मनात आदरयुक्त भावना निर्माण झाली. कालिदास आपल्या पत्नीकडे माता म्हणून पाहू लागले. त्यांच्या पत्नीने तत्काळ कालिदासांना ” एका स्त्रीहस्ते तुझा मृत्यू होईल”, असा शाप दिला.

कालिदास त्यांच्या बुद्धितुर्याने गरीब ब्राह्मणांना राजाकडून सहाय्य मिळवून देत होते. अनेक अवघड समस्या सोडवून जीवनातील आणि काव्यातील कठीण कोडी चटकन उकलून दाखवण्याची हातोटी कालिदासांकडे होती.

एकदा कालिदासांकडे एक गरीब ब्राह्मण आला. त्याने भोजराजाकडून त्याला काहीतरी द्रव्य मिळावे अशी कालिदासांकडे प्रार्थना केली.

हा ब्राह्मण विशेष शिकलेला नव्हता त्यामुळे त्याला केवळ पुरुषसुक्तातील एकच मंत्र तोंडपाठ होता. कालिदासांना त्याच्या बौद्धिक आणि आर्थिक दारिद्र्याची कीव आली. कालिदास त्या ब्राह्मणाला म्हणाले,

” तू चिंता करू नकोस तुला जो मंत्र पाठ आहे तो तू राजाच्या सभेत म्हणून दाखव.”

एवढे सांगून कालिदास त्या ब्राह्मणाला घेऊन भोजराजाच्या दरबारात गेले. राजसभेत त्या ब्राह्मणाला त्याने पाठ केलेला तो मंत्र म्हणण्यास सांगितले. पण विद्वानांच्या त्या सभेत ब्राह्मणाच्या तोंडून तो अर्धवट मंत्र म्हटला गेला. त्यानंतर त्याला कापरे भरले. त् तो त्या भरसभेत मख्ख चेहरा करून उभा राहिला. कालिदास त्या ब्राह्मणाची बाजू घेण्यासाठी पुढे सरसावले ते म्हणाले, “महाराज या विद्वान कविवर्यांना शत्रूवर चाल करावयास निघालेल्या आपल्या अफाट सैन्याचे वर्णन करायचे आहे. ते त्यांनी पुरुषसुक्तातील पहिल्या चरणाने आरंभिले. तूर्त ते विनयामुळे थांबले आहेत. आपले सैन्य स्वारीवर झपाट्याने निघाले तेव्हा त्याच्या प्रचंड हालचालीच्या हिसक्यांनी शेष म्हणजे सहस्रशीर्ष लटपटू लागला. इंद्र त्या सेना सागराकडे पाहून आश्चर्यचकित झाला आणि सूर्य सैन्याने उठविलेल्या धुरळ्याने झाकून गेला.”

असली विलक्षण काव्यमय स्तुती त्या ब्राह्मण कवीने केलेली आहे. कालिदासाच्या मुखातून हे सारे ऐकून भोज राजा संतुष्ट झाला आणि त्याने ब्राह्मणाला भरपूर दान दिले. त्यामुळे त्या ब्राह्मणाचे जन्माचे दारिद्र्य दूर झाले.

महाकवी बाणांनी कालिदासांच्या सरसकाव्याला मधुर रसाने

थबथबलेल्या मंजिरीची उपमा दिली आहे. जयदेवांना कालिदासांच्या काव्यात कविता कामिनीचा प्रत्यक्ष विलास दिसतो. गोवर्धनाचार्य राजशेखर इत्यादी रसिकांना कालिदासांचे काव्य म्हणजे भारतीय रससिद्ध सत्कवीच्या अग्रभागी आहे, याचा साक्षात्कार होतो.

उपमा कालिदासाचीच, शृंगाररस कालिदासानेच वठवावा, स्त्रीहृदयाचे रहस्य केवळ कालिदासालाच उमगले आहे. असे वल्लभाचार्य म्हणतात. कालिदासांशी बरोबरी करेल असा दुसरा कवी सापडला नाही. कालिदासानंतरचा कवी म्हणजे रसिकांच्या दृष्टीने हाताच्या करंगळीनंतरचे बोट होय. म्हणजेच अनामिक कवी!

पृथ्वीवर राहून सुद्धा स्वर्ग सुखाचा अनुभव घ्यावयाचा असेल तर त्याने शरद ऋतूतील चंद्राचे किरण, शर्करायुक्त दूध, तारुण्यातील मादक नवाळी, कोमलांगी युवती आणि कालिदासाची कविता यांचे सेवन करून पाहावे.

संस्कृत कविता ही वाल्मिकींची खेळकर कन्या! व्यासांकडून तिच्यावर शिक्षण संस्कार झाले. पुढे तिने विदर्भदेशाच्या रितीप्रमाणे कालिदासालाच पती म्हणून वरले. रसिकांचे असे अभिप्राय स्वतःच इतके बोलके आहेत की त्याबद्दल अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही.

प्रसिद्ध जर्मन कवी गटे आणि आपल्याकडील भारतीय रवींद्रनाथ ठाकूर हे दोघे कालिदास लिखित शाकुंतलाच्या मोहिनीने वेडावून गेले होते. गटे म्हणतो, ” स्वर्ग आणि पृथ्वी यांचे मधुर मिलन जर कोठे पाहायचे असेल आणि तारुण्याची टवटवी व परिपक्वतेची फळे जर कोणाला एकाच स्थळी आलेली बघायची असतील तर मी कालिदासाच्या शाकुंतल नाटकाकडे अंगुलिनिर्देश करीन.”

कालिदासाची वृत्ती ही शृंगारात रमत असली तरी ती स्वैराचाराकडे वळलेली नाही. रंगेल असली तरी गृहस्थाश्रमाचे पावित्र्य तिने बिघडवले नाही.

एकदा कालिदास त्यांचा मित्र कुमारदास याला भेटण्यासाठी सिंहलद्वीपात गेले होते. त्यावेळी एका स्त्री कडून त्यांना तिथल्या राजाने घातलेले समस्यापूर्तीचे पद कळले ते पद असे..

कमले कमलोत्पत्ति: श्रूयते न दृष्यते।

आशय – एका कमलावरच दुसऱ्या कमलाची उत्पत्ती होते असे ऐकिवात आहे पण ही गोष्ट प्रत्यक्ष दृष्टीला येत नाही.

अशी एक समस्या काव्यातून प्रकट केली होती आणि ते काव्य पूर्ण करणाऱ्याला मोठे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते.

कालिदासांनी हे ऐकताच तिथल्या तिथे समस्यापूर्तीचा पुढचा श्लोक रचला…

बाले तव मुखाम्भोजे कथमिन्दिवरद्वयम् ।

आशय – हे कुमारी, असे जर आहे तर तुझ्याच मुखमलावर दोन नेत्ररुपी निळी कमळे दिसतात हे कसे?

कालिदासांनी हे त्या स्त्रीला सांगितले समस्यापूर्तीचे जाहीर झालेले बक्षीस आपल्याला मिळावे या दुष्ट इच्छेने त्या स्त्रीने कालिदासाचा खून केला. पुढे हा अपराध उघडकीला आला कुमार दासाला हा वृत्तांत कळाला त्याने मित्र प्रेमामुळे कालिदासाच्या चितेवर स्वतःला जाळून घेतले. ती जागा सिंहलद्विपात माटर नावाच्या दक्षिण प्रांतात किरिंदी नदीच्या मुखाजवळ अद्याप दाखवली जाते. असे डॉक्टर सतीश चंद्र विद्याभूषण यांनी म्हटले आहे.

अशा प्रकारे कालिदासांच्या पत्नीने “एका स्त्रीहस्ते तुझा मृत्यू होईल”, असा शाप कालिदासांना दिला होता तो खरा ठरला.

– दुर्गेश जयवंत परुळकर