‘सक्षम समीक्षा’ विशेषांकाचे थाटात प्रकाशन

0

डॉ. रवींद्र शोभणे यांचा हृद्य सत्कार

नागपूर(Nagpur), 26 मे साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने 97 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे(Dr. Rabindra Sobhane)यांना प्राप्‍त झाल्‍याबद्दल विविध संस्‍थांच्‍यावतीने आज रविवारी त्‍यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. तसेच, यावेळी त्यांच्या साहित्‍यावर आधारित ‘सक्षम समीक्षा’ विशेषांकाचे यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.

विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अमेय दालनात झालेल्‍या या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते तर मुख्य म्‍हणून अतिथी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, ‘सक्षम समीक्षा’चे संपादक डॉ. शैलेश त्रिभुवन, सुनीता त्रिभुवन, वि. सा. संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, डॉ. रवींद्र शोभणे यांच्‍या पत्‍नी अरुणा शोभणे यांची उपस्थिती होती. डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते डॉ. रवींद्र शोभणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. शोभणे म्हणाले, नागपुरातील तथाकथित लोक मला उजवा ठरवतात. पण त्यांनी माझे साहित्य वाचलेले नसते. केवळ विरोधाकरिता विरोध करण्याचे काम करत असतात. मी अतिशय तर्कंनिष्ठ विचारांचा लेखक आहे. ‘असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर’ ही विंदांची कविता सादर करून ते म्हणाले मी या विचारांनी जीवन जगतो.
डॉ. गिरीश गांधी म्हणाले, विंदांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे डॉ. शोभणे यांच्या धडपडीचे, मेहनतीचे फळ आहे. कोणतीही जबाबदारी निष्ठेने पार पाडणे, ही त्यांची ओळख आहे. सव्यसाची लेखन करणारा ते एक लेखक आहेत. विदर्भाच्या साहित्याचा ध्वज त्यांनी महाराष्ट्रभर फडकवला, हे अभिनंदनीय आहे.

श्रीपाद अपराजीत यांनी डॉ. रवींद्र शोभणे यांचा निगर्वी व्यक्तिमत्त्व असा उल्‍लेख केला. ते म्‍हणाले, त्यामागे त्‍यांची सचोटी, प्रामाणिकपणा आणि मेहनत आहे. त्याचा आईवरील लेख उत्कृष्ट आहे. त्यांच्या गोत्र या पुस्तकात त्यांनी रंगविलेल्या व्यक्तिरेखा वाचनीय आहेत.

शैलेश त्रिभुवन यांनी विशेषांकाबद्दल विस्‍तृत माहिती दिली. डॉ. शोभणेंवरील हा 16 वा विशेषांक आहे. 1960-70 पासून जे लेखन करत आहेत आणि आजही त्यांचे काम सुरू आहे. अशा लोकांची दखल घेण्याची शब्दाली प्रकाशनची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दृकश्राव्य चित्रफितीद्वारे शब्दाली प्रकाशन, वारजे पुणे अंतर्गत प्रकाशित सक्षम समीक्षाचे शैलेश त्रिभुवन यांचा प्रवास दाखविण्यात आला. तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डॉ. शोभणे यांची क्षणचित्रे व माहिती असलेली चित्रफितही दाखविण्यात आली. यावेळी अंकात लेखन करणार्‍या लेखकांचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन विवेक अलोणी यांनी, तर आभार प्रदर्शन सुनीता त्रिभुवन(Sunita Tribhuvan)यांनी केले. यावेळी विदर्भ साहित्‍य संघाचे नितीन सहस्रबुद्धे, राजेंद्र डोळके, सना पंडित, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे निलेश खांडेकर, गिरीश गांधी फाऊंडेशनचे राम काळे, वनराई फाऊंडेशनचे अनंतराव घारड, यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनचे डॉ. महाकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.