

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये जवळपास ३८५०० पदे रिक्त असून या रिक्त पदांची टक्केवारी एकूण मंजूर कर्मचारी संख्येच्या ३५ टक्के आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वीज कंपन्यांची स्थापित क्षमता तसेच वीज ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊनही त्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भर्ती केली गेली नाही. तिन्ही वीज कंपन्यांमध्ये आज जवळपास ४२ हजार कंत्राटी कामगार कार्यरत असताना त्यांना स्थायी सेवेत सामावून न घेता त्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. तेव्हा तिन्ही वीज कंपन्यांमधिल संपूर्ण रिक्त पदे मागासवर्गीयांच्या अनुशेषासह भरण्यात यावी या प्रमुख मागणीसह वीज कर्मचाऱ्यांच्या इतर धोरणात्मक प्रलंबित मागण्यांच्या सोडवणूकीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे दि.११ डिसेंबर २०२३ रोजी विद्युत भवन, काटोल रोड, नागपूर येथून स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. एस. पाटील यांचे नेतृत्वात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी बाजारमार्गे लिबर्टी टॉकीज येथे मोर्चा आल्यानंतर मोर्चास अडविण्यात आले.
महावितरण कंपनीमधिल तंत्रज्ञ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करून त्यांना वेतनश्रेणी-३ मध्ये सामावून घ्यावे व त्यांच्या वाहन भत्त्यात वाढ करावी, यंत्रचालक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये न्याय द्यावा, मागासवर्गीय पदविकाधारक अभियंत्यांवर पदोन्नतीमध्ये सातत्याने होणारा अन्याय दूर करावा, गट विमा योजनेचा लाभ वीज कंपन्यांनी स्वतःच्या महसुलातून द्यावा, वीज कर्मचाऱ्यांना शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करावी, अभियांत्रिकी पदवी व पदविका प्राप्त कर्मचाऱ्यांना सहाय्यक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता पदावर सामावून घ्यावे, मृत कर्मचारी वारसांना कंत्राटी पद्धतीऐवजी स्थायी स्वरूपात नियुक्ती द्यावी, तंत्रज्ञ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भर्ती कंत्राटी पद्धतीने न करता स्थायी स्वरूपात करण्यात यावी, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या तंत्रज्ञ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरतीमध्ये प्राधान्यक्रमाणे सामावून घ्यावे या प्रमुख मागण्यांसह इतरही प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीची मागणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय घोडके यांनी मोर्चाला संबोधित करताना केली.
या मोर्चाला स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील, संघटनेचे सरचिटणीस प्रेमानंद मौर्य, कार्याध्यक्ष संजय मोरे, प्रमुख संघटक सूर्यकांत जनबंधु, स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र जारोंडे, स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सागर तायडे, संघटनेचे उपसरचिटणीस किशोर अहिवळे, मिलिंद खंडारे, अश्वजित गायकवाड यांचेसह अनेक पदाधिकाऱ्यांनी संबोधित करून प्रलंबित प्रश्न न सुटल्यास शासन व वीज कंपन्यांविरोधात तिव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. मोर्चानंतर डॉ. संजय घोडके यांचे नेतृत्वातील पाच पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विधानभवनात जाऊन मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांना सादर केले.
या मोर्चात तिन्ही वीज कंपन्यांमधिल राज्याच्या सर्व जिल्ह्यातील जवळपास १० हजार वीज कर्मचारी तसेच कंत्राटी कामगार सहभागी झाले होते.