१०वे रुग्ण साहित्य सेवा केंद्राचे गोंडपिपरी येथे भव्य उद्घाटन

0

 

डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचा समाजसेवेचा वसा; गरजू रुग्णांसाठी आणखी एक पाउल

गोंडपिपरी (Gondpipari) ४ सप्टेंबर २०२५ — डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, चंद्रपूर (पूर्व विदर्भ) संचलित स्व. श्री. अरुणसिंह गौर व स्व. सौ. सुशीलाबाई अरुणसिंह गौर स्मरणार्थ रुग्ण साहित्य सेवा केंद्राचे उद्घाटन गोंडपिपरी येथे अत्यंत उत्साहात पार पडले.

या केंद्राचे हे १० वे केंद्र असून, ते कन्याका सभागृहाजवळ दिनांक ४ सप्टेंबर रोजी विधिवत सुरू करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला मा. विभाग प्रचारक, रा.स्व.संघ चंद्रपूर दिनदयालजी कावरे, ऍड. आशिष धर्मपुरीवार (सचिव, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती), तसेच प्रकल्प सहयोगी व प्रमुख उद्घाटक चेतनसिंह गौर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

श्री. चेतनसिंह गौर यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समितीस मदत करून या केंद्राची उभारणी केली. यामुळे अनेक गरजू रुग्णांना रुग्ण साहित्याची मोफत किंवा अत्यल्प दरात मदत मिळणार आहे.
संघ शताब्दी निमित्त समितीने चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असे सेवा प्रकल्प सुरू करण्याचा संकल्प केला असून, हे सर्व प्रकल्प येत्या दसऱ्याच्या पूर्वी पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे.

कार्यक्रमाला तालुका कार्यवाह, व्यवस्था प्रमुख, तसेच गोंडपिपरी परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजसेवेचा खरा अर्थ राबवणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.