

जळगाव(Jalgaon),२७ जून २०२४ :- शिवरायांच्या जीवनावर मराठी भाषेत अनेक चरित्रे, नाटके, कादंबऱ्या, कथा, प्रवासवर्णने, काव्य, पोवाडे, संशोधनपर साहित्य, बखरी आदी साहित्याची निर्मिती झाली. पण आजवर झालेल्या ९६ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एकदाही महाराजांवरील साहित्याचा विचार झाला नाही. ज्या राज्यात शिवचरित्र घडले, त्या महाराष्ट्रातच अशा संमेलनांनी महाराजांच्या कार्याची उपेक्षा केली, अशी खंत अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी व्यक्त केली.
साथ त्रिशती शिवराज्याभिषेक महोत्सवाचे औचित्य साधून विश्वातील पहिल्या अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर तंजावरचे श्रीमंत शिवाजी राजे भोसले, स्वागताध्यक्ष आमदार राजू भोळे, संरक्षक अशोक जैन, कार्याध्यक्ष डॉ. केतकी पाटील, सचिव किरण बच्छाव, कर्नल पवन कुमार, पोलीस निरीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, निमंत्रक प्रा. डॉ. लक्ष्मण देशमुख, संयोजक रवींद्र पाटील व भारती साठे यांची उपस्थिती होती.
विजयराव देशमुख यांनी, शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे किंवा देशाचे नव्हे तर साऱ्या विश्वातील एक आदर्श महापुरुष होते. त्यांचा धाडसी, विवेकी स्वभाव, कुशाग्र बुद्धिमत्ता, निर्णय शक्ती, शिस्त, गडांच्या बांधणीचे, स्थापत्य शास्त्राचे ज्ञान अतुलनीय होते, असे सांगत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. शिवचरित्र हा भारताच्या इतिहासाचाच एक अंश आहे पण परकीयांच्या विजयाच्या नोंदीनी भरलेला आपला इतिहास वाचतांना आधीच न्यूनगंडांनी पछाडलेल्या भारतीयांच्या मनावर अधिकच निर्जीवता आल्याची खंतही त्यांनी यावेळी केली.
शिवचरित्र संशोधनाच्या बाबतीत देशात विशेषतः महाराष्ट्रात तसेच युरोपातही आज देखील अनेक तरुण शिवभक्तांची पिढी झपाटल्यागत शिवाजी महाराजांच्या काळातील अप्रसिद्ध बखरी, कागदपत्रे तसेच महाराजांच्या चरित्रातील अनेक दुर्लक्षित पैलूंचा, युद्धनीतीचा, व्यवस्थापन कौशल्याचा, दुर्गांच्या रचनेचा अभ्यास करताना दिसत असल्याबद्दल विजयराव देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. या संमेलनाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे वास्तववादी चरित्र संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिवाजी महाराजांची कॉपी करावी अध्यक्षीय भाषण संयोजकांनी आधीच प्रिंट करून वाटले आहे त्यामुळे ते फुटले आहे. आज पेपर फुटीची दुर्दैवी घटना घडत असताना शिवाजी महाराजांवरील भाषण फुटले, हे चांगलेच झाले. कारण आपण शिवाजी महाराजांची कॉपी करावी, त्यातून व्यक्तित्व घडवावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला शिवाजी महाराजांच्या सैन्यातील पराक्रमी सैनिकांचे वंशज विक्रम पालकर, कृणाल मालुसरे, विशाल मोहिते, माणिकराव नाईक बावणे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी केले तर स्वागतपर भाषण डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी केले. राजू भोळे यांनीदेखील आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले तर भारती साठे यांनी आभार मानले.
‘हिंदवी स्वराज्य’ ॲपचे विमोचन सकाळी 8.00 वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाला आरंभ झाला, शिवप्रतिमेसमोर ‘शककर्ते शिवराय’ हा ग्रंथ मिरवीत ढोलपथकासह पारंपरिक वेषात दिंडी काढण्यात आली. जगभरातील 65000 शिवप्रेमी बंधु भगिनींनी वाचलेले यावर्षीचे ‘बेस्ट सेलर’ ‘शककर्ते शिवराय’ चे लेखक श्री. विजयराव देशमुख यांचे व तंजावर चें छत्रपती शिवाजी राजे यांचे त्यांनी स्वागत केले. मंचावर उपस्थित डॉ. केतकी पाटील यांचे ‘हिंदवी स्वराज्य ऍप चे विमोचन करण्यात आले.