

नागपूर : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचाराचा सर्व खर्च शासन करेल, जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.