मणिपूरमध्ये शांततेसाठी सरकार प्रयत्नरत

0

नवी दिल्ली(New Delhi), 03 जुलै :- गेल्या वर्षभरापासून मैतेई आणि कुकी जमातीच्या संघर्षात धुमसत असलेल्या मणिपूर संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, बुधवारी राज्यसभेत भाष्य केले. मणिपूरमध्ये शांतता नांदावी यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याची माहिती मोदींनी दिली. तसेच विरोधकांनी शांततेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मणिपूरमध्ये आगीत तेल ओतण्याचे काम करू नये असा टोलाही त्यांनी लगावला.

पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी(Narendra Modi) मंगळवारी लोकसभेत बोलत असताना विरोधकांनी मणिपूर हिंसेवर त्यांची प्रतिक्रीया नसल्याचे सांगत गदारोळ केला. यापूर्वीही विरोधकांनी मणिपूर हिंसाचारावरून मोदींवर अनेकदा टीका केलीय. यापार्श्वभूमीवर आज, बुधवारी राज्यसभेत पंतप्रधानांनी मणिपूरच्या मुद्यावर भाष्य केले. पंतप्रधान म्हमाले की, मणिपूरमध्ये आता हिंसाचार कमी होत आहे.

तसेच शांतता प्रस्थापित होत आहे. काँग्रेसने या प्रकरणी राजकारण करू नये. जे लोक मणिपूरच्या विषयावरून आगीत तेल ओतत आहेत. त्यांना मणिपूर एक दिवस नाकारेल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच काँग्रेसला त्यांच्या कार्यकाळात मणिपूरमध्ये लावण्यात आलेल्या राष्ट्रपती शासनाची आठवण करवून दिली. राज्यसभेत संबोधित करताना मोदी म्हणाले की, मणिपूरबाबत मागच्या अधिवेशनात मी सविस्तर बोललो होतो. त्यावेळी उल्लेख केलेल्या बाबींची मी आज पुनरावृत्ती करू इच्छितो. मणिपूरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

तिथे ज्या काही घटना घडल्या आहेत, त्याबाबत 11 हजारांहून अधिक एफआयआर नोंदवल्या गेल्या आहेत. मणिपूर हे एक लहान राज्य आहे. तेथे हिंसाचारानंतर पाचशेहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे हे आपण मान्य केले पाहिजे. त्यामुळे शांततेवर विश्वास ठेवणं शक्य होत आहे.

मणिपूरमधील बहुतांश भागात शाळा- महाविद्यालये, कार्यालये आणि उद्योग सामान्यपणे सुरू आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसच्या कार्यकाळात मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि त्यानंतर लावलेली राष्ट्रपती राजवट याचे स्मरण मोदींनी करवून दिले. काँग्रेसच्या कार्यकाळात मणिपूरमध्ये 10 वेळा राष्ट्रपती राजवट लागली होती. तिथली परिस्थिती माहिती असूनही विरोधकांकडून राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात 1993 मध्ये अशाच घटना घडल्या होत्या. त्यानंतर जवळपास 5 वर्षे ही अशांततेची मालिका सुरू होती असे मोदींनी सांगितले.