सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

0

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर (Maratha Reservation Issue) सरकारची भूमिका समजावून तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ लवकरच अंतरवली सराटी येथे पोहोचणार असून ते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत.
जरांगे यांनी सरकारला देण्यात आलेली मुदत २४ डिसेंबरला संपत आहे. त्यानंतर, आपण आंदोलनाची घोषणा करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मंगळवारी राज्य सरकारने फेब्रुवारीत विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय होणार असल्याचे जाहीर केले आहे. जानेवारी महिन्यात येणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची राज्य सरकारला प्रतीक्षा आहे. मात्र, तोवर वाट पाहण्याची मनोज जरांगे यांची तयारी नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. २४ डिसेंबरपूर्वी आरक्षण जाहीर करावे, अशी अडवणुकीची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सरकारकडून होत आहेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), उदय सामंत (Uday Samant) आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा या शिष्टमंडळात सहभाग असणार आहे. या तीनही नेत्यांचं शिष्टमंडळ दुपारी दोन वाजता आंतरवाली सराटी गावात जाऊन जरांगे यांची भेट घेणार आहे. मात्र, जरांगे यांचा रोख पाहता ते आंदोलनावर कायम राहतील, असे संकेत मिळत आहेत.