

थकबाकीमुक्ती संधीला उरले ६८ दिवस
गोंदिया (Gondia) :- कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीची रक्कम एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरणच्या अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. संपूर्ण व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ होणाऱ्या या योजनेचा जिल्ह्यातील ग्राहक लाभ घेत आहेत. वीजबिलांच्या थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना ९१ दिवसांसाठी म्हणजे १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत राबवत आहे. आता या योजनेच्या कालावधीला ६८ दिवस शिल्लक आहेत
कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे किंवा मूळ थकबाकीची सुरूवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीदेखील सोय आहे.
येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ही योजना राबविली जाणार असून, यासाठी आता ६८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे अशात थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन वीज जोडणी करून घ्यावी व योजनेला लाभ घ्यावा, असे कार्यकारी अभियंता शैलेश कांबळे यांनी कळविले आहे.