राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात स्वत:ला झोकून द्या – कुलगुरु डॉ. नितीन पाटील

0

– स्व. गुरुदेव सोरदे प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 53 वे विदर्भ प्रांत अधिवेशन

नागपूर (NAGPUR) : 27 जानेवारी
मागील 76 वर्षापासून अभाविप विद्यार्थ्यांच्या क्षेत्रात काम करीत असून व्यक्तिमत्व निर्माणातून छात्रशक्तीचा विकास हेच त्यांचे ध्येय आहे. या त्रिदिवसीय अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे, ते ग्रहण करुन विद्यार्थ्यांनी स्वत:ला राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात झोकून द्यावे असा हितोपदेश महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील यांनी दिला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 53 वे विदर्भ प्रांत अधिवेशन नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनातील स्व. गुरुदेव सोरदे प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी रेशीमबाग मैदानावर करण्यात आले. याप्रसंगी कुलगुरु डॉ. नितीन पाटील, विशेष अतिथी आदित्य-अनघा सोसायटीच्या संस्थापिका अनघा सराफ, स्वागत समितीच्या उपाध्यक्षा डॉ. परिणिता फुके, महानगर उपाध्यक्षा मेधा कानेटकर, विदर्भ प्रांत उपाध्यक्ष प्रा. भागवत भांगे, महानगर सहमंत्री संदेश उरकुडे व अनुज पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. नितीन पाटील यांनी अभाविपच्या स्थापनेनंतरच्या संपूर्ण कालावधीत व्यक्तिमत्व विकासातून छात्रशक्तीचा विकास करण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. युवक उर्जावान असतात त्यांनी स्वत: सक्षम होऊन समाजाला आधार द्यावा व त्यातून राष्ट्रनिर्माण शक्य असल्याचे तत्व सातत्याने सांगण्यात येत आहे. आधुनिक काळात तर युवापिढीला दिशा देण्याचे काम करावयाचे आहे. या अधिवेशनातून सांघिक व वैयक्तिक विकास साधावा व या क्षेत्राचे नेतृत्व करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

याप्रसंगी विशेष अतिथी अनघा सराफ यांनी, युवकांमध्ये राष्ट्रहित रुजविण्याचे काम अभाविप सातत्याने करीत आहे. यात राष्ट्रप्रेम व समर्पण याची शिकवण देण्यात येते. त्यामुळे याठिकाणी सर्व सद्गुणांचे धडे घ्या, इतरांना ते शिकवा आणि संपूर्ण पिढीला मार्गदर्शन करा व त्यानंतर नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे असे आवाहन केले.
यासोबतच स्वागत समिती उपाध्यक्ष डॉ. परिणिता फुके यांनी, अभाविप हे राष्ट्रनिर्माणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. यातून युवकांना शिक्षण, प्रेरणा आणि चारित्रनिर्मितीचे धडे देण्यात येत आहेत. युवकांमध्ये हे गुण रुजविल्यामुळे संपूर्ण युवापिढी घडविण्यात यश येईल व हेच काम आज आधुनिक काळात आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रारंभी भागवत भांगे यांनी प्रास्ताविकातून संपूर्ण अधिवेशनाची माहिती दिली तसेच हे प्रांत अधिवेशन छात्रउर्जेचे ऐतिहासिक केंद्र व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
दीप्रप्रज्वलन, प्रदर्शन उद्घाटन व अवलोकनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. संचालन डॉ. मेधा कानेटकर यांनी तर आभारप्रदर्शन अनुज पवार यांनी केले.

चौकट
पूर्व कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाची माहिती
अधिवेशनासाठी 23 जिल्ह्यातून 2300 प्रतिनिधी आले असून त्यांच्या उपस्थितीत प्रदर्शन कक्ष उद्घाटन पार पडले. या प्रदर्शन कक्षात श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर, पूर्व कार्यकर्ते स्व. अरविंद खांडेकर, सदानंद खोब्रागडे, गजाननराव कुंटे, किशोर शुक्ला, स्व. सुरेश तापस आदींची छायाचित्रे व कार्यकर्तृत्वाचा आलेख सादर करण्यात आला असून मध्यभागी अयोध्येतील रामललाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. अभाविपमधील सहभागामुळे अनेकांच्या जीवनाला आकार मिळाला, त्यांची माहिती देखील या कक्षात प्रदर्शित करण्यात आली आहे.