

मंथन
मनुष्याचे आयुष्य क्षणभंगुर आहे.ईश्वराने जेवढे आयुष्य दिले आहे त्याचा परिपूर्ण उपयोग करून घेण्याचा प्रत्येक व्यक्तीचा प्रयत्न असतो.आयुष्य जगतांना अनेक इच्छा आकांक्षा असतात. त्या आज ना उद्या केव्हातरी पूर्ण होईल या आशेवर मनुष्य जगत असतो. इच्छा अनंत असतात. त्या सर्व पूर्ण होईलच असेही नाही.
काही व्यक्तींचा जन्मच सुखवस्तू कुटुंबात होतो तर काही व्यक्तीचे आयुष्य अतिशय खडतर राहते. कुटुंबातच विविध समस्या असतात.विशेषत:आर्थिक समस्या ही फारच बिकट असते. त्यांच्या आयुष्याची सुरुवातच जवाबदारीचे ओझे घेऊन होते. म्हणजे जे वय खेळणे बागडण्याचे राहते त्या वयात त्यांना कौटुंबिक जवाबदारीचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. जवाबदारीच्या ओझ्यामुळे त्यांचे लहाणपणच विसरल्या जाते.
*प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगले सुप्त गुण असतात. त्यांच्यात कला असते.छंद असतात.कला,छंद, गुण हे लहाणपणा पासूनच जपले, जोपासले तर पुढे जाऊन त्या कलेत,छंदात निपुण होत ते समाजात कलाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण होऊ शकते. समाजात अशाही काही व्यक्ती आहेत की,जे कौटुंबिक जवाबदारी चे ओझे सांभाळत त्यांनी आपली कला,छंद समाजापर्यंत पोहोचवली आहे. यांचे कारण त्यांना कुटुंबाची साथ मिळाली आहे.ते कधीच त्याच्या कलागुणांच्या आड आले नाहीत. समाजापुढे जेव्हा त्यांची कला, छंद, गुण आलेत तेव्हा समाजानेही त्यांना तेवढेच प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळेच त्या त्या क्षेत्रात त्यांना मानाचे स्थान मिळाले आहे.
*व्यक्तीच्या कुठल्याही कलागुणांना,छंदाला वाव द्यायचे असेल तर त्याला कुटुंबाकडून ही तितकेच सहकार्य मिळाले पाहिजे. प्रोत्साहन मिळायला हवे. त्यासाठी घरातील कौटुंबिक वातावरण नेहमीच सकारात्मक असावे लागते. पण असे होत नाही. त्यामुळे अनेकदा घरातील अडचणींमुळे कला, छंद, गुण सार्वजनिक रित्या व्यक्त करता येत नाही.ते त्यांच्या पुरताच सिमीत राहतात.याच कारणांमुळे बऱ्याचदा आयुष्यात त्यांची इच्छा असूनही त्यांना पाहिजे तसे जगता येत नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. परिस्थिती अशी विचित्र येवून ठेपते की व्यक्तीच्या अंगी असलेले छंद, कला,गुण जवाबदारी कडे गहाण ठेवावे लागतात.यामुळे व्यक्तीमध्ये नैराश्य येते. अन् आयुष्यात आलेली ही नैराश्यताच मनुष्याला समोर जाऊ देत नाही.*
*अनेकदा आपण जिथे काम करतो किंवा आपला निवास जिथे आहे किंवा आपल्याच नातेवाईकांमध्ये अशा काही व्यक्ती असतात की ते कलाकार आहेत,त्यांचे मध्ये चांगले गुण आहेत.पण परिस्थितीने ते व्यक्त करू शकत नाही. त्यांचे मधील कलाकार ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणाकडून काही सकारात्मक प्रयत्न करता येईल का याचा विचार केला तर निश्चितपणे त्याची कला समाजाभिमुख होऊ शकते. तसेच या व्यक्तींनी आपल्या वर असलेली कौटुंबिक जवाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत असतांनाच त्यांनी आपल्या अंगभूत असलेले कलागुण, छंद स्वतःहून जोपासण्याचा प्रयत्न केला तर अशा व्यक्तींना दुहेरी आनंद मिळू शकतो हे निश्चित.पहा पटतं का.
रवींद्र गोविंद पांडे
ग्रंथालय भारती
सक्षम