
नवी दिल्ली NEW DELHI : सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यावर उद्योगपती गौतम अदानी यांची घोडदौड सुरुच आहे. अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वधारले असून आता उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील अब्जाधीशांच्या यादीतही अदानी यांनी मोठी झेप घेत असून ते आता १२ व्या स्थानावर आले आहेत.
अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणात उद्योगपती गौतम अदानी यांना दिलासा दिला आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बाजार नियंत्रक ‘सेबी’ ही एक सक्षम यंत्रणा असून सेबीच्या तपासात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पर्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालय सेबीच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही, असा निकाल दिला होता. तेव्हापासून अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वधारले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ झाली आहे. त्याच्या संपत्तीत मागील चोवीस तासात ७.६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी १२ व्या स्थानावरून १३ व्या स्थानावर घसरले आहेत.
अदानींची संपत्ती
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची संपत्ती ९७ अब्ज डॉलर्स आहे. मागील चोवीस तासात वाढलेल्या संपत्तीमुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ९७.६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्याची एकूण संपत्ती ६६५ दशलक्षने वाढली आहे. गुरुवारपर्यंत अदानी या यादीत १४ व्या क्रमांकावर होते. मात्र गेल्या २४ तासांत त्यांच्या प्रचंड कमाईमुळे त्याच्या नेट वर्थमध्ये चांगली वाढ झाली आहे. ते आता १४ व्या स्थानावरून १२ व्या स्थानावर पोहोचले आहेत. आगामी काळात त्यांची घोडदौड आणखी किती होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.