
नागपूर- ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Biopic on Nitin Gadkari) या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. गडकरी यांची संपूर्ण कारकीर्द नागपुरात घडली असल्याने नागपूरकरांना देखील या चित्रपटाबद्दल विशेष उत्सूकता दिसून येत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले अनुराग भुसारी यांनी सांगितले की, गडकरी यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. अभ्यासू राजकारणी, प्रभावी वक्ता, कणखर विचारांचा नेता, विकासाचा ध्यास घेणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. समाज कल्याणाचा ध्यास घेणाऱ्या नेत्याचा राजकीय प्रवास लोकांना माहिती असला तरी त्यांचे खासगी आयुष्य व तारुण्य देखील तेवढेच रंजक आहे. त्यामुळे हा प्रवासही चित्रपटातून लोकांपुढे मांडण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित गडकरी या चित्रपटाचे निर्माते हे अक्षय अनंत देशमुख आहेत. या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. या चित्रपटात गडकरी यांची भूमिका साकारणे आव्हानात्मक ठरले असून ती कोण साकारत आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सूकता आहे. २७ ॲाक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.