आत्‍मनिर्भर’ भारताचे स्‍वप्‍न पूर्ण करा – अमित गुप्ता

0

वायसीसीईचा 11 वा पदवीदान समारोह उत्‍साहात संपन्‍न

नागपूर, 22 मार्च

वेगाने बदलणा-या तंत्रज्ञानामुळे जगदेखील बदलत असून मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत आहेत. या संधीचा फायदा घेण्‍यासाठी सतत शिकत राहा, आपल्‍या अंगभूत कौशल्‍यातून नवनवे आविष्‍कार घडवा आणि आत्मनिर्भर भारत साकारण्याचे स्‍वप्‍न पूर्ण करा, असे आवाहन टाटा कन्‍सल्‍टन्‍सी सर्व्हिसेसचे डिलेव्हरी, ऑपरेशन आणि स्ट्रॅटेजिक बिझनेस हेड अमित गुप्ता यांनी नवपदवीधरांना केले.

नगर युवक शिक्षण संस्थेतर्फे संचालित यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनियरींग या स्वायत्त महाविद्यालयाचा 11 वा पदवीदान समारंभ शनिवारी श्री दत्ता मेघे ऑडिटोरीयम येथे पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून टीसीएस नवी दिल्लीचे अमित गुप्ता उपस्‍थ‍ित होते तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. राजेंद्र काकडे, प्राचार्य डॉ. यु. पी. वाघे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

वायसीसीईचे माजी विद्यार्थी असलेल्‍या अमित गुप्ता यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. पदवी घेतल्यानंतर व्यावसायिक जगात आपले स्‍वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतात शिवाय, जनसंपर्क जोपासावा लागतो. पदवी प्राप्‍त केल्‍यानंतर तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होत असून, समाज, देश आणि गरजूंना मदत करण्याचा भाव मनात जागृत ठेवा, व मूल्‍ये जोपासा, असा सल्‍ला अम‍ित गुप्‍ता यांनी दिला.

सुरुवातीला प्राचार्य यु. पी. वाघे यांनी स्वागतपर भाषणातून संस्थेच्या वाटचालीचा आणि रुबी ज्युबिली महोत्सवादरम्‍यान आयोजित करण्‍यात येत असलेल्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयात संशोधन व विकासावर भर देण्यासाठी स्टार्टअपसाठी नवा विभाग सुरू करण्यात आल्‍याचे तसेच, पेटंट विषयक मार्गदर्शन देखील करण्यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. राजेंद्र काकडे यांनी, हा दिवस पालक व विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा असून समाजासाठी काही तरी करण्याचे ध्येय ठेवा व पुढे मार्गक्रमण करा, असे आवाहन केले.

या पदवीदान समारोहात वर्ष 2023-2024 या शैक्षणिक सत्रासाठी सिव्हील इंजिनियरींग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल इंजिनियरींग व मास्टर ऑफ टेक्नॉलॉझी आदी विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांना पदके व सन्‍मानचिन्‍ह, 1333 पदवी, 27 पदव्युत्तर प्रमाणपत्र करण्यात आली.

या कार्यक्रमात यावेळी सर्वोच्च गुणांनी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी गुंजन बालपांडे (बीटेक सुवर्ण), सुवर्ष राजनकर (बीटेक सुवर्ण), मेघना पुणेकर हिला स्व. हेमंत ठाकरे स्मृती सुवर्ण पदक, अपूर्वा जाधव सुवर्णपदक व सन्मानचिन्ह, तेजस्विनी पडोळे हिला सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी सुवर्णपदक तर कॉलेजमधून सर्व अभ्यासक्रमातील टॉपर म्हणून प्रणय देऊळकर यांना पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरविंदर कौर यांनी केले.