कचऱ्यापासून संपत्ती, प्रकल्प उभारणीला नागपुरात सुरुवात

0

नागपूर NAGPUR  : मागील अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा असलेला कचऱ्यापासून संपत्ती निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागत असून सोमवारी नागपूर महानगर पालिकेच्या भांडेवाडी येथील १ मेट्रीक हजार टन क्षमतेच्या घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Nitin Gadkari, Devendra Fadnavis  यांच्या हस्ते पार पडले.

कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागपूरची आता प्रदूषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असल्याचे प्रतिपादन यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर महानगरपालिकेचे भांडेवाडी येथे १००० मेट्रीक टन क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र प्रकल्पाचे भूमिपूजन गडकरी आणि फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

घनकचरा प्रक्रिया केंद्र परिसर, बिडगाव रोड भांडेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, नेदरलँडचे महावाणिज्यदूत श्री. बार्ट डी जोंग, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी उपस्थित होते. गडकरी यांनी सांगितले की, एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा ‘वेस्ट टू वेल्थ’ आणि ‘नॉलेज टू वेल्थ’ या दोन्ही सिद्धांताना सुसंगत असा आहे. या प्रकल्पामुळे नागपूरचा विकास होईल आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे उत्तम उदाहरण देशापुढे उभा करेल. सॉलिड वेस्ट वेगळे करून त्यातून खत निर्मिती, सीएनजी गॅस, एलएनजी गॅस, प्लास्टिक पासून इंधन तयार करता येईल. त्यामुळे हा प्रकल्प प्रदूषण मुक्तीसाठी महत्वाचा ठरेल. प्रकल्पाद्वारे मनपाची मोठी बचत होईल आणि दरवर्षी आर्थिक उत्पन्न मिळेल. या प्रकल्पातून निघणाऱ्या सीएनजीचा वापर मनपाच्या बसेस मध्ये करण्याची सूचना त्यांनी केली.
नागपूर शहरात घरे, दुकाने, आस्थानांमधून निघणा-या कच-यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, कम्पोस्ट, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होणार असून, त्याची विक्री करण्याचे अधिकार नव्याने स्थापन कंपनीला देण्यात आले आहेत. बाय-प्रोडक्टच्या विक्रीमधून होणाऱ्या उत्पन्नातून प्रथम रु. १५ लक्ष प्रतिवर्ष मनपाला प्राप्त होणार आहेत.