
यवतमाळ – मागील वर्षी एप्रिल, मे व जून महिन्यात कापसाला 12 ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. पण यंदा कापसाला सात हजारांचा भाव आहे. मागीलवर्षी पेक्षा यावर्षी रासायनिक खताचे भाव वाढले, मजूराच्या खर्चात वाढ झाली, किटकनाशक औषधीचे दर वाढले पण कापसाचे भाव वाढले नाहीत. यंदा मात्र कापसाला 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने कर्ज कसे फेडावे, शिवाय कापूस वेचणी करणाऱ्या मजूरांची मजूरी सुद्धा निघत नाही व स्वतः व कुटूंबाचे उदरनिर्वाह कसा करावा आणि पुढील हंगामाची मशागत कशी करावी या पेचात कापूस उत्पादक शेतकरी सापडला आहे. कापूस घरातच पडून असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशातच कर्जाच्या वसूलीसाठी सावकार अन् कापूस वेचणारे मजूरही मजूरीचे पैसे मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारावर येत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी डबघाईस आलेला आहे. मागील तीन चार वर्षात कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नव्हता, पण गेल्या एक दोन वर्षांत कापसाला उच्चांकी दर मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु कापसाचे भाव वाढण्याऐवजी घटत गेले व आता व्यापारी 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल कापसाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च निघालाच नाही व उत्पादन घेण्यासाठी कर्ज काढले. ते कसे भरावे व मजूरांना त्यांची मजूरी कशी द्यावी, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.