

नागपूर (Nagpur) :- अग्रेसर फाऊंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय गणितीय दिवसाच्या निमित्ताने सेवासदन हायस्कुल येथे नुकत्याच पार पडलेल्या “बे एके बे” ही गणीत स्पर्धेत मैत्री परिवार संस्थेचा विद्यार्थी प्रणय अग्गुवार याला “बे एके बे टेबल चॅम्पियन फ्रॉम नागपूर” ह्या शीर्षकाने सन्मानित करण्यात आले.
प्रणय हा टिळक विद्यालय धंतोली येथील मध्यामिक शाळेचा विद्यार्थी आहे. त्याने या स्पर्धेत वर्ग आठ ते दहा गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत नागपुरातील एकूण 30 शाळांचे सुमारे चार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणितज्ञ सुरेश बोरगावकर होते तर केशवनगर हायस्कूलचे मुख्याध्यापक मिलींद भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी तसेच, टिळक विद्यालय माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सपना कुरळकर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकांनी प्रणयचे कौतुक केले.