वीज कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

0

लग्नसमारंभाला जाऊन घरी परत येत असताना अंगावर वीज कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी (दि.२४) ५ वाजताच्या सुमारास घडली. यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. भारत राजगडे, अंकिता भारत लक्ष्मण राजगडे (पत्नी), देवांशी भारत राजगडे (४ वर्ष) मुलगी, लावण्या भारत राजगडे (२ वर्ष) मुलगी अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

भारत राजगडे हे वडसा तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी असून ते सहपरिवार दुचाकीवरून कुरखेडा येथे लग्न समारंभाला गेले होते. लग्न समारंभ आटोपून सायंकाळच्या सुमारास कुरखेडावरून वडसा तालुक्यातील आमगाव येथे परत येत होते. अचानक विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होत असल्याने वडसा-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरी (तुळशी फाटा) जवळ झाडाखाली दुचाकी थांबविली. अचानक वीज कोसळल्याने भारत राजगडेसह संपूर्ण परिवाराला यात जीव गमवावा लागला.
सध्या चौघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय वडसा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे यांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी देसाईगंज नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, नायब तहसीलदार आर. डी. नैताम उपस्थित होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.