


सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन प्रमाणे नवीन पेन्शन देण्याच्या मुद्द्यावर संप पुकारला आहे. कृती समितीचे प्रमुख विश्वास काटकर यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारने तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे. तसेच नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्धार संबंधित कर्मचारी संघटनेने केला आहे.
———–
‘एकजूट महाराष्ट्रासाठी अभिमान विकासासाठी
महायुतीकडून २० आगस्टपासून निघणार यात्रा
गेल्या दोन वर्षांपासून महायुती सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून केलेली कामगिरी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महायुतीनं कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती सरकारच्या वतीनं ‘एकजूट महाराष्ट्रासाठी‘ अभियान विकासासाठी… कल्याणासाठी ही यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे सर्वच नेते सहभागी होतील, अशी माहिती महायुतीचे समन्वय आमदार प्रसाद लाड यांनी दिली. येत्या २० आगस्टपासून या यात्रेची सुरूवात होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात मेळाव्यांचं आयोजन केलं जाणार आहे. महायुती सरकारनं गेल्या दोन वर्षांत केलेली कामगिरी, जनहिताच्या योजना, लाभार्थी संमेलन आयोजित केली जाणार आहेत. या यात्रेदरम्यान विभागीय मेळाव्यांचंही आयोजन केलं जाणार आहे.
———
अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती
देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
परमबिर सिंग जे बोलले ते खरे आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. आम्ही त्याचा पर्दाफार्श करु शकलो. मी, प्रविण दरेकर, गिरीश महाजन अन्य काही नेते यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी दिली होती. पण काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खोट्या केसेस टाकण्यास नकार दिला, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले. माझ्या अटकेसाठी एकदा नाही तर चार वेळा प्रयत्न झाले. पण यांना काही मिळाले नाही. यांचे व्हीडिओ पुरावे सीबीआयला देण्यात आले आहेत. आजही आमच्याकडे अनेक व्हीडीओ पुरावे आहेत. योग्यवेळी ते सादर करू, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
———–
बांगलादेशमधील हिंदू, बौद्ध बांधवांच्या पाठीशी उभे रहावे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
बांगलादेशमधील अस्थिर राजकीय स्थिती व अराजकतेच्या वातावरणात हिंदू, बौद्ध व अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशातील सर्व राजकीय पक्षांना एकजूट दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तेथील हिंदू, बौद्ध व इतर अल्पसंख्यांकांच्या पाठीशी भारतातील सर्व राजकीय पक्षांनी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले आहे.
———–
खुल्या भुखंडाच्या मालकाविरुद्ध एफआयआर दाखल
नागपूर महापालिकेची कडक कारवाई
आरोग्यास धोकादायक खुल्या भुखंडाच्या मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेने आरोग्यास धोकादायक अशा खुल्या भुखंडाच्या मालकाविरुद्ध कडक कारवाईला सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाद्वारे आरोग्यास धोकादायक अशा तीन खुल्या भुखंडाच्या मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
———
लातूरात मराठा आंदोलक आक्रमक
आ. नीतेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
भाजप आमदार नीतेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी सार्वजनिक शौचालयासमोरच आमदार नितेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध केला. यापुढे जर जरांगे यांच्यावर टीका के ली तर महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.