हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन

0
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन

चंदीगड, २० डिसेंबर: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रमुख नेते ओम प्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. चौटाला हे पाच वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ते गुरुग्राम येथील त्यांच्या घरी होते. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ११.३० वाजता त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात आणण्यात आले. सुमारे अर्ध्या तासानंतर दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज शुक्रवारी (२० डिसेंबर) सायंकाळपर्यंत त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सिरसा येथील चौटाला येथे आणले जाईल. जिथे त्यांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर गावातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वादग्रस्त कार्यकाळ

मुख्यमंत्री असताना १९९९ ते २००० या काळात चौटाला यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन हजार शिक्षकांची भरती केली. या प्रकरणी सीबीआयने चौटाला आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरुद्ध ६ जून २००८ मध्ये विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. १६ जानेवारी २०१३ रोजी यांच्यासह त्यांचा मुलगा अजय चौटाला व इतर ५३ जणांना न्यायालयात दोषी ठरविले गेले व अटक करण्यात आली. २२ जानेवारी २०१३ रोजी न्यायालयाने यांना दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती.