या कारणासाठी शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

0

मुंबई (Mumbai) :- मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद हे विधानमंडळातील सर्वोच्चपद गेले २ वर्षे ६ महिन्यांपासून रिक्त आहे.
लोकशाही तत्व जपणारे वरीष्ठ सभागृह हे विनाकॅप्टन चालू असल्याची भावना महाविकास आघाडीच्या आमदारांची झालेली आहे. सद्यस्थितीत १४ व्या महाराष्ट्र विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. पर्यायाने विधानपरिषदेचे या शासन कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असेल. त्यामुळे मा. सभापती या संविधानिक पदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, अशा मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मा. राज्यपाल रमेश बैस यांची आज भेट घेऊन दिल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

सभापती पदाची निवडणूक व्हावी, अशी भूमिका वारंवार महाविकास आघाडीने मांडली आहे. हे पद रिक्त राहणे हे घटनेच्या विरोधात आहे. सभापती पदासाठी
निवडणूक लावणे हा मा. राज्यपाल यांचा अधिकार आहे. वारंवार मागणी करूनही या सरकारने याबाबत राज्यपालांकडे याबाबत माहिती दिली नाही. त्या आधारावर या सरकारला सभापती पदाची निवडणूक घेण्यासाठी सूचना करा, अशी मागणी आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याकडे केली आहे. महाविकासआघाडीच्या या भूमिकेला मा. राज्यपाल यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

या सरकारच हे शेवटच अधिवेशन असून निरोपाचा अधिवेशन आहे, त्यामुळे सभापती पदाची निवडणूक लवकरात लवकर होणे आवश्यक असल्याचे दानवे म्हणाले.या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे, गटनेते, आ.अजय चौधरी, आ. अनिल परब,आ. भास्कर जाधव,
आ. रमेश कोरंगावकर, आ.सचिन अहिर, आ.सुनिल शिंदे, आ.ज.मो.अभ्यंकर,
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आ.शशिकांत शिंदे, काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आ.भाई जगताप, आ.राजेश राठोड,
शेकापचे नेते व आ.जयंत पाटील उपस्थित होते.