

पुण्यातील सर्वश्रुत अशी घटना. मध्यरात्र उलटून गेले असताना मागून येणाऱ्या एका पॉर्शे गाडीने धडक दिल्याने मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन इंजिनियर्सचा जागीच मृत्यू होतो. ज्याने धडक दिली ती गाडी शहरातील एका श्रीमंत बिल्डरचा पोरगा वेदांत अगरवाल दारु पिऊन चालवत असतो. मध्यरात्रीनंतरही रस्त्यावर बऱ्याच गाड्या असताना हा शेफारलेला पोरगा वेदांत कशाचाही विचार न करता नशेत समोरच्या बाईकला ठोकतो. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली मुलगी अश्विनी कोस्टा १५-२० फूट हवेत उडून जमिनीवर आदळते आणि जागीच गतप्राण होते. ती बाईक चालवणारा मुलगा अनिश अवधिया धडक बसल्याने तडफडत असतो. आसपासचे लोक त्याला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करतात, पण तोपर्यंत त्यानेही जीव सोडलेला असतो. (Pune Porsche accident)
दरम्यान, सेवेत तत्पर असणारी पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल होते! दाखल होताच, अपघातात पोर्शे गाडी आहे म्हणजे प्रकरण श्रीमंतांशी संबंधित आहे आणि म्हणूनच लूटमार करायला या प्रकरणात मोठा वाव असणार हे चाणाक्ष पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लागलीच ध्यानात आले. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत आरोपी वेदांतला जमावापासून वाचवून पोलीस ठाण्यात नेले. ती शहरातील एका बड्या असामीची औलाद आहे हे कळताच तपासाची चक्रे वेगाने फिरतात. रात्री तीन वाजता त्याचा बाप स्थानिक आमदाराला डायल करतो. आमदार साहेब लागलीच कामाला लागतात. पोलिस विभाग तर काय कायदा फाट्यावर मारण्याची ताकद असलेला. त्यामुळे ज्यांचा धडक लागून मृत्यू झाला, त्यांच्या वेदना अव्हेरून ज्याने धडक दिली त्या गाडी चालकाचा बचाव करण्यासाठी तमाम पोलिस यंत्रणेने बेशरमपणाचा निच्चांक गाठत अगरवाल कुटुंबियांसाठी कायद्याची पाऽऽर ऐशीतैसी करून टाकण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी किती रोकड अगरवालांच्या खिशातून लंपास झाली, याची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी, या प्रकरणात पोलिस विभाग ज्या पद्धतीने अगरवालांच्या छोकऱ्यासाठी पायघड्या घालत होता, ते बघितल्यावर बोली मोठ्याच आकड्याची लागली असणार यात शंका नाही. (Pune Porsche accident news Live Updates)
एकदा मांडवली झाली आहे म्हटल्यावर चिंताच नव्हती. अपघात झाला म्हणून काय झालं? गाडीच्या धडकेत दोन जण ठार झाले म्हणून काय झालं, मदतीला पोलिस मैदानात उतरले म्हटल्यावर सारं कसं पाहिजे तसं जुळून आलं होतं. श्रीमंत बापाच्या बिघडलेल्या पोरांच्या दिमतीला उभ्या राहिलेल्या पुणेकर पोलिसांनी तजवीजच अशी केली की, कायद्यालाही लाज वाटावी. त्यांनी त्या कोवळ्या पोराची निरागसता ध्यानात ठेवून त्याला लागलीच बेल मिळेल अशा कलमा एफआयआर मधे नोंदवल्या. आणि बेधडकपणे काही तासांतच त्याला सोडूनही दिले. कायद्याची खिल्ली उडविण्याचे काम खुद्द पोलिस विभागाने केले.
घटनेची बातमी जगासमोर आली तर अडचण होईल याची कल्पना असल्यामुळे १५ तासांच्या आत आरोपीला न्यायधीशांसमोर हजर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. वेदांत गाडी चालवतच नव्हता असा बनाव तयार करण्याचा प्रयत्न देखील झाला. तो गाडी चालवत असताना बाजुला बसलेला ड्रायव्हरच मी गाडी चालवत होतो, म्हणायला पुढे आला. पण प्रत्यक्षदर्शींच्या ठाम कथनामुळे तो बनाव उघडा पडतो. शेवटी, बिचारा अजून अल्पवयीन असल्याने त्याचे वय लक्षात घेऊन माफी दिली जावी, असा घोषाही आळवला गेला. पोरगं दारूच्या नशेत होतं हे दडपण्याचा प्रयत्नही अगरवाल कुटुंब आणि पोलिस यंत्रणेने केला. पण पोलिसांचे नशिबच फुटके निघाले. त्यांनी लावलेली मोठ्या आकड्याची बोली काही केल्या फळली नाही. कारण अगरवालांच्या दिवट्याने घटनेपूर्वी जिथं बसून दारू पिली तिथले सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने थातुर मातुर टेस्ट सॅम्पल लॅबला पाठवल्याचे नाटक रचले गेले.
दरम्यान, वेदांतच्या बापाला पोराला चढलेली दारू उतरविण्याची घाई झालेली असते. थकला असेल बिचारा म्हणून त्याला क्रोसीनची गोळी दिली जाते. पोरगं उपाशी असेल म्हणून तेवढ्या पहाटे पिझ्झा आणि बर्गरची व्यवस्था त्यांच्यासाठी केली जाते. पोलिसांच्या मूक संमतीने हा लाजिरवाणा प्रकार बेमुर्वतखोरपणे सुरू असतो.
याच दरम्यान, अपघात घडला तिथे रस्त्यावर पडलेले दोन मृतदेह डिस्पोज करून त्यांच्या त्यांच्या आई बापांच्या हाती सोपवण्याची कारवाई करण्याची सुरूवात होते. इकडे न्यायव्यवस्था खडबडून जागी झालेली असते. नव्हे, घटनेची चर्चाच अशी रंगलेली असते की, न्याय व्यवस्थेला खडबडून जागे होणे क्रमप्राप्त ठरते. इतक्या गंभीर घटनेत पोलिसांनी लावलेली कलमं तकलादू असल्याचे ध्यानात येऊनही, जिथे दोन लोकांचा बळी गेलाय अशा घटनेत अगरवाल यांच्या निरागस पोराला जामीन दिला गेला.आणि पोलिसांसोबतच न्यायालयानेही कायद्याची पाऽऽर ऐशीतैसी झालेली याचि देही बघितली. आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहण्यास सांगण्यापासून तर ट्रॅफिक पोलिसांसोबत १५ दिवस काम करणे आणि दारूचे व्यसन सोडण्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणे, एवढ्यावर वेदांची बोळवण होते. दारूच्या नशेत दोघांचा बळी घेण्याची शिक्षा फक्त एवढीच असते….
जर एखाद्या अल्पावयीन मुलाने जर अघोरी गुन्हा केला असेल तर त्याला प्रौढ गृहीत धरले जावे अशी तरतूद जुवेनाईल कायद्यात आहे. ती तरतूद न्यायालयाच्या लक्षात आली नसेल? बापाने कमावलेल्या पैशाच्या जोरावर पोरांनी दारू पिऊन असा सार्वजनिक धिंगाणा घालायचा आणि पोलिस व न्याय व्यवस्थेने ते खपवून घ्यायचे? हा कुठला न्याय आहे? अरे साधा सिग्नलचा नियम पाळला नाही तर चार चार पोलिस अंगावर धावून आल्यासारखे येतात पुढे अन् इथे तर चक्क अपघात केलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्याची धडपड करतेय पोलिस आणि न्याय व्यवस्था! अजब आहे सारे! सरकारी व्यवस्था नेमकी कशी अन् कोण राबवून घेतो, हे सिद्ध करणारी ही घटना आहे.
Pune porsche accident driver name
Pune porsche accident name of boy
Pune porsche accident victims
Pune porsche accident builder name
Pune accident driver name
Pune porsche accident in hindi
Pune Accident CCTV
Pune Accident News Hindi