

दूध दरामध्ये मोठी घसरण; शेतकर्यांना आर्थिक फटका
पुणे (Pune)12 गायी, म्हशीच्या दूध दरात घट झाल्याने दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे गोठा मालकांनी तर जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवत दावणी रिकाम्या करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात दुभत्या जनावरांच्या किंमतीही 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. दूध दर उतरल्याने शेतकर्यांना जनावरे सांभाळण्याराठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो. मात्र, चार्याअभावी आणि दुधाचे घसरलेले दर यामुळे बळीराजाला नुकसान सहन करत जनावरांचे पालन-पोषण करावे लागत आहे.
ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा पशुपालन व्यवसाय निवडला जातो.त्यामुळे शेतकर्यांच्या दारासमोर हमखास दोन-चार जनावरांची दावण असते. तरुणवर्गही दूध व्यवसायाकडे आकर्षित झाल्यामुळे तालुक्यातील अनेक गावागावात जनावरांचे गोठे तयार झाले होते. मात्र, दुधाचे दर उतरल्याने उत्पादन आणि खर्चात प्रचंड तफावत निर्माण झाली. त्यामुळे दूध उत्पादकांनी जनावरांना बाजारचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली आहे. लोणंद, बारामती, काष्टी, राशीन येथील बाजारात जनावरांच्या किमती कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.