Ashish Deshmukh अखेर सावनेरची दादागिरी संपुष्टात ! -डॉ.आशीष देशमुख

0

 

नागपूर -कॉग्रेसचे सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांना १५० कोटींच्या घोटाळ्यात दोषी ठरवून कोर्टाने ५ वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली. लगेच विधानसभेच्या सभापतींनी त्यांना आमदारकीसाठी अपात्र घोषित केल्यामुळे त्यांची आमदारकी गेली. सुनील केदार यांची आमदारकी गेल्यामुळे सावनेरकरांवर आलेली अवकळा आणि पापाचे ओझे गेले. सावनेरच्या जनतेवर सातत्याने होत असलेला अन्याय, भ्रष्टाचारी प्रवृत्ती, गुन्हेगारी वृत्ती आणि दादागिरी संपुष्टात आल्याची प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार डॉ आशीष देशमुख Ashish Deshmukh  यांनी दिली आहे.

केदार मागील कित्येक वर्षापासून शासनाला न जुमानता गैरमार्गाने पैसा कमावत होते आणि प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी आणि त्यांच्या ठराविक दलालांनी पूर्ण विदर्भात पसरविला होता. सुनील केदार ह्यांनी सर्व सामान्य ठेवीदारांचे पैसे बुडवण्याचे पाप उघडपणे केले. शेतकऱ्यांनी घामानी कमावलेल्या पैश्याची सुनील केदार यांनी अक्षरशः लुट केली. सावनेर विधानसभा क्षेत्रातील जनता आणि गरीब शेतकऱ्यांचा त्यांनी प्रचंड विश्वासघात केला. २२ वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेला नागपूर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक ज्या निर्णयाची वाट पाहत होते, तो निर्णय कोर्टाने दिला, त्याबद्दल कोर्टाचे आभार व्यक्त करताना येणारे दिवस सावनेर विधानसभा क्षेत्राच्या जनतेसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी चांगले राहतील आणि विकासाची नवी दालने उघडतील असा विश्वास व्यक्त केला आहे. देशमुख सावनेर मतदारसंघात भाजपचे दावेदार आहेत. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८(३) नुसार, एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या आणि किमान दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली व्यक्ती संसद सदस्य किंवा विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरते. 10 जुलै 2013 रोजी सुप्रीम कोर्टाने लिली थॉमस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्याचा निकाल देताना असा निर्णय दिला की, कोणताही खासदार, आमदार किंवा विधान परिषद सदस्य (MLC) ज्याला गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्याला किमान दोन वर्षांची कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे, तात्काळ प्रभावाने सभागृहाचे सदस्यत्व गमावेल. जर दोषसिद्धीवर स्थगिती नसेल तर, लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदींनुसार सदस्यास तात्काळ प्रभावाने अपात्र ठरवले जाईल. याबाबत स्पीकरला अधिसूचना जारी करावी लागते. पाच वर्षांची शिक्षा पूर्ण होऊनही केदार आणखी सहा वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत.असेही देशमुख यांनी म्हटले आहे.