छत्तीसगड चकमकीत महिला नक्षलवादी ठार

0

रायपूर (Raipur), 10 जुलै  : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील छोटा बेथिया या
नक्षलग्रस्त भागात मंगळवारी पोलिस-नक्षलवादी चकमक झाली. या चकमकीत जवानांनी एका
महिला नक्षलवाद्याचा खात्मा केला आहे. शोध मोहिमेदरम्यान, जवानांनी घटनास्थळावरून एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह, शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेली महिला नक्षलवादी माओवादी संघटनेतील पीएलजीए कंपनी क्रमांक 5 ची सदस्य होती. मात्र, अद्याप तिची ओळख पटलेली नाही. या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जखमी झाल्याचा दावाही उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या 6 महिन्यांत बस्तर पोलिसांनी वेगवेगळ्या चकमकीत 138 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कांकेरचे एसपी कल्याण अलसेला यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांकेर डीआरजी, बस्तर फायटर्स आणि बीएसएफच्या 30व्या आणि 94व्या बटालियनचे जवान बिनागुंडा पोलिस स्टेशन परिसरातील जंगलात नक्षलवादी असल्याच्या माहितीवरून शोध मोहिमेवर निघाले होते.

यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी डीआरजी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला आणि सुमारे एक ते दीड तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर नक्षलवादी पळून गेले. चकमक संपल्यानंतर जवानांनी घटनास्थळावरून झडतीदरम्यान एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला. महिला नक्षलवादी पीएलजीए कंपनी क्रमांक-5 ची सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय घटनास्थळावरून जवानांनी एक 303 रायफल, एक 315 बोअरची रायफल, मोठ्या प्रमाणात नक्षलवादी देशी बनावटीची शस्त्रे आणि स्फोटक वस्तू
आणि दैनंदिन वस्तू जप्त केल्या आहेत. ही चकमक नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात, बीनागुंडा पोलिस स्टेशनपासून 12 किलोमीटर अंतरावर झाली. सध्या ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख पटवली
जात आहे.