दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांचं आंदोलन

0

 

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील आडगाव बुद्रुक या ठिकाणी संपूर्ण गावकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला आहे.फक्त 23 रुपये भाव मिळतो. तो भाव 40 रुपये व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. अधिवेशनात जर हा मुद्दा उचलला गेला नाही तर धुळे सोलापूर महामार्ग रोखून आणि आमरण उपोषण करून आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना 23 रुपये प्रति लिटर दुधाला भाव दिले जातात. मात्र, हा भाव खूप कमी प्रमाणात असून तो किमान 40 रुपयापर्यंत वाढवून द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या राज्यात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनामध्ये राजकीय चिखलफेक सुरू आहे. नवाब मलिक यांच्या विषयी संपूर्ण अधिवेशन बोलत आहे. शेतकऱ्यांच्या विषयाकडे कुणाचंही लक्ष नाही. आमचेचं दूध आम्हाला जर विकत घ्यायचे असेल तर ते साठ रुपये भावाने घ्यावे लागते. मग आमच्या दुधाला किमान 40 रुपये भाव द्यावा, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे सरकारने हिवाळी अधिवेशनात पटलावर हा मुद्दा घेऊन चाळीस रुपये हमीभाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सरकारने आमची मागणी पूर्ण न केल्यास आम्ही येणाऱ्या काळात जवळच असलेला धुळे सोलापूर महामार्ग रोखून धरू त्यानंतर ही मागणी त्यानंतरही मागणी मान्य न केल्यास छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये आमरण उपोषणाला बसू, असा इशारा देखील शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.