शेतकरी नेते रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात

0

बुलडाणा : कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा यासाठी २९ नोव्हेंबरला मंत्रालयात ताब्यात घेण्याच्या आंदाेलनाची घोषणा करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांना शनिवारी बुलडाणा पोलीसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. तुपकर यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

शेतकरी नेते तुपकर यांनी २० नोव्हेंबरला बुलडाण्यात एल्गार महामोर्चा काढला होता. जिल्हाभरातून हजारो शेतकरी बुलडाण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर २८ नोव्हेंबरला मुंबईला धडक देऊन २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा तुपकर यांनी या मोर्चातून दिला होता. या आंदोलना पासून परावृत्त करण्यासाठी बुलडाणा पोलीसांनी शुक्रवारी रविकांत तुपकर यांनी कलम १४९ अंतर्गत नाेटीस बजावली हाेती. त्यावेळी अशा नाेटीसांना मी भीक घालत नसल्याचे ते म्हणाले होते. शनिवारी बुलडाणा शहर पोलीसांनी दुपारच्या सुमारास शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर रविकांत तुपकर यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यांना शहर पाेलीस ठाण्यात आणण्यात आले.