

नागपूर (Nagpur) – भाजपचे संकल्पपत्र लोकांनी स्वीकारले आहे कारण यात मोदींची गॅरंटी आहे. दुसरीकडे काँग्रेसचा जाहीरनामा अपयशी ठरला असून काँग्रेसकडे विकासाची दृष्टी, जनहिताची कुठलीही गोष्ट नसल्याने व त्यांची विश्वासार्हता जनतेत संपल्याने केवळ संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात येणार अशी त्यांची जुमलेबाजी सुरू आहे. उद्या ते ताजमहालही बांधून देऊ असे सांगतील असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेत काँग्रेसला लगावला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ मोहन मते,प्रवीण दटके, कृष्णा खोपडे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले,काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा यात दोष नाही कारण ते वाचतच नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या आरोपांविषयी ते म्हणाले की, कर्नाटकमध्ये काय आश्वासन दिले आहे, किती पूर्ण केले ते त्यांनी आधी बघितले पाहिजे. संविधान हा ग्रंथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असून पूर्ण बहुमत असताना देखील ते बदलण्याचा विचार त्यांनी केला नाही.सर्वोच्च न्यायालयाने देखील संविधानाचा मूलभूत गाभा बदलता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. तीन राज्यात मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरकार आले आता पुन्हा देशातही एकदा सरकार येणार असा दावा फडणवीस यांनी केला.
दरम्यान, अग्नीवीर योजना रद्द करण्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या जाहीरनामात दिलेले आश्वासन याकडे लक्ष वेधले असता यात देशाचेच नुकसान होईल. भारतीय सैन्यामध्ये युवकांचा अधिकाधिक सहभाग असावा अशी मागणी सैन्यातूनच होत आहे यावर भर दिला. यासोबतच ओबीसी कल्याणाच्या विविध योजना भाजप मोदी सरकारने राबविल्या असून ओबीसी संदर्भात बोलण्याचा काँग्रेसला अधिकारच नाही. काँग्रेसने ओबीसी समाजाचा केवळ वापर केला असा आरोप फडणवीस यांनी केला. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी भ्रष्ट नेत्यांना वॉशिंगमशीनमधून स्वच्छ करून आपल्या सोबत घेतल्याची काल नागपुरातील जाहीर सभेत टीका केली याविषयी थेट उत्तर देणे टाळले.मोदी सरकारने 10 वर्षात पारदर्शकपणे काम केल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. या देशाच्या रक्तातच लोकशाही आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर घाला घातला पण त्यांना देखील लोकशाही संपवता आलेली नाही असेही फडणवीस यांनी ठासून सांगितले.