

ब्रेस्ट कॅन्सर वॉरियर-मीट एंड ग्रीट या कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर (Nagpur), २५ ऑक्टोबर
Breast cancer : ब्रेस्ट कॅन्सर झाला म्हणून घाबरू नका. ब्रेस्ट कॅन्सर बरा होऊ शकतो. वेळेत निदान आणि उपचार करा. मात्र, मनात एक भीती असते, ती भीती देखील बाळगू नका आणि ब्रेस्ट कॅन्सर उपचारांना बिनधास्त सामोरे जा. येथे बसलेले सगळे या उपचारांना सामोरे गेले म्हणून आज कॅन्सरमुक्त जीवन जगू शकलेत, असा सल्ला ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ. अरुंधांती मराठे लोटे यांनी दिला. पॅनेशिया क्लिनिकच्या विद्यमाने ब्रेस्ट कॅन्सर वॉरियर-मीट एंड ग्रीट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सौरभ प्रसाद प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला ब्रेस्ट कॅन्सर मधून बाहेर आलेले आणि सध्या ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे रुग्ण आले होते. रुग्णांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम नागपुरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना डॉ सौरभ प्रसाद यांनी सांगितले की, उपचार पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा, असा हितोपदेश दिला. यावेळी ब्रेस्ट कॅन्सर विकारातून बाहेर पडलेल्या महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना कर्करोग समुपदेशक अर्चना साठे-दास म्हणाल्या की, जर कर्करोगाचे निदान झाले, तर सर्वप्रथम त्याचा स्वीकार करा. मी स्वतः या कर्करोगातून गेले. अनुभवावरून सांगते की, मार्ग सापडतो. डॉक्टरचा सल्ला घ्या आणि कर्करोगाचे उपचार करण्यावर भर द्या. दुसरे असे की, महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या व स्तनात कधी गाठ आढळली तर पहिले डॉक्टरचा सल्ला घ्या.
यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत विविध खेळ खेळण्यात आले. यावेळी कॅन्सर वॉरियर सुनिता दुबे, मंजिरी साने यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. समीर लोटे विशेषत्वाने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पल्लवी धांडे, पौर्णिमा बोंबले, डिंपल वाघमारे यांनी प्रयत्न केले.
ब्रेस्ट कॅन्सरचे निदान हे प्राथमिकतः स्वयं स्तन तपासणीतून दिसून येते. जर कुठलीही गाठ दिसली तर त्याचे निदान व उपचार करून घ्या. वेळेत निदान आणि उपचार केल्यास ब्रेस्ट कॅन्सरवर मात शक्य आहे.
डॉ. अरुंधती मराठे-लोटे (Dr. Arundhati Marathe-Lote
Breast Cancer Surgeon)
ब्रेस्ट कॅन्सर सर्जन