नेत्रदान चळवळीला समाजाचे सहकार्य असावे

0

मंथन

नेत्रदान या चळवळीला समाजाचे सहकार्य असावे

*जग फार सुरेख आहे.हे जग नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. सौंदर्याने नटलेले जग तीच व्यक्ती पाहू शकते जिला दृष्टी आहे.या जगात असे अनेक लोकं आहेत की, ते दृष्टीहीन आहेत.जे लोकं दृष्टिहीन आहेत त्यांचे दुःख या पृथ्वीतलावावरील कोणतीही डोळस व्यक्ती समजू शकत नाही.जनतेत अंध व्यक्तीबद्दल सहानुभूती जरूर आहे.परंतू या अंध व्यक्तींना फक्त सहानुभूती नको तर त्यांना सहकार्याची, मदतीची गरज आहे,अपेक्षा आहे.*
*दरवर्षी १० जून हा जागतिक दृष्टि दान दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक नेत्र विशारद डॉ आर.ए.भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.हे सुंदर जग पाहण्याचा हक्क,अधिकार सर्वांना आहे.पण हा हक्क, अधिकार काही व्यक्तिंच्या वाट्याला नाही.आपण हे सुंदर जग पाहू शकत नाही याचे शल्य प्रत्येक दृष्टिहीन व्यक्तीला आहे. आज विज्ञान इतके समोर गेले आहे की, दृष्टिहीन व्यक्तीचे दुःख,शल्य डोळस व्यक्तींनी मनात आणलं तर ते संपवू शकतात.सोपे झाले आहे.*
*१० जून जागतिक दृष्टि दान दिवस साजरा करण्याचा एकमात्र उद्देश आहे की, जास्तीत जास्त अंध व्यक्तींना दृष्टी दान करण्यासाठी समाजातील लोकांना प्रेरणा मिळेल.आज नेत्रदानाला समाजात जागृती निर्माण झाली नाही.दृष्टी दान ही एक चळवळ व्हायला पाहिजे.*
*नेत्रदानाला समाजामध्ये स्वतःहून इच्छा निर्माण होत व्यापक प्रमाणात नेत्रदान व्हायला पाहिजे.आज भारत सरकारतर्फे नेत्रदान संबंधी प्रोत्साहन दिले जात आहे.समाजातही अनेक संस्था नेत्र पेढी कार्यरत आहेत.परंतू या सर्वांकडून अनेक प्रयत्न केले जात आहे पण पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही याचेच दुःख आहे.फक्त भारताचाच विचार केला तर, दरवर्षी जवळपास एक कोटी लोक मृत्युमुखी पडतात. परंतू असे कमी लोकं आहेत की ते मरणोत्तर दृष्टी दान करतात.*
*अनेकदा मृत व्यक्तीची नेत्रदानाची इच्छा असते. तसे जीवंतपणी नेत्रालयात लिखीत स्वरुपात त्यांचेकडून इच्छापत्र पण सादर केले जाते.परंतू अनुभव असा आहे की,मृत व्यक्तीच्या घरच्यांचाच याला विरोध असतो.काही वेळा तर दृष्टी काढणाऱ्या संस्थेला कळविले ही जात नाही. तसेच मृत व्यक्तीने नेत्र दानाचे इच्छा पत्र लिहून दिले आहे हे घरातीलच मंडळींना माहीत नसते.*
*थोडक्यात काय की, नेत्रदान हे किती गरजेचे आहे, तसेच व्यक्तीचा मृत्यू झाल्या नंतर त्या व्यक्तीचे दृष्टी सोबतच इतर अवयव गरजू व्यक्तीला उपयोगी पडेल आणि ती व्यक्ती सर्वसामान्य जीवन जगू शकेल ही मानसिकता तयार झाली पाहिजे.ही मानसिकता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत या चळवळीला यश मिळणार नाही. नेत्रदानाची चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तळागाळातील लोकांच्या सहकार्याची गरज आहे. नाहीतर असे जागतिक दिवस दरवर्षी साजरे केल्या जातील पण त्याचा मुळ उद्देश साध्य होणार नाही.*
*या नेत्रदान कामासाठी समाजात अनेक संस्था,नेत्र पेढी भारतात काम करीत आहेत. भारतात एकही व्यक्ती दृष्टीहीन राहणार नाही असे जर खरोखरच वाटत असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने जिवंतपणी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांशी वा नेत्र पेढी शी संपर्क साधून आपले संकल्प पत्र द्यावे.तसेच आपण असा संकल्प केला आहे हे घरातील त्याचबरोबर आपल्या जवळच्या मित्र मंडळींना सांगितले पाहिजे.जेणेकरून या इच्छा पत्राचा उपयोग होऊ शकेल. या चळवळीला आपण सर्वांनी सहकार्य करावे, प्रोत्साहन मिळावे जेणेकरून या कामाला गती मिळून बळ मिळेल.तसेच आपण जाता जाता एक ईश्वरी कार्य करून जातो आहे ही भावना राहील. सर्व दानात नेत्रदान हे श्रेष्ठ दान जे म्हटले आहे ते उगीचच नाही.चला तर आजच आपण संकल्प करू या.*

रवींद्र गोविंद पांडे
ग्रंथालय भारती
सक्षम