

चंद्रपूर(chandrapur) राज्यात केंद्र शासनाच्या नियमानुसार खरीप हंगाम 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येते. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी संरक्षण घ्यावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा योजना देऊ केली आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर( www.pmfby.gov.in) थेट ऑनलाईन स्वरुपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरू केली होती व भाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै 2024 होता. मात्र शेतक-यांची अडचण लक्षात घेता पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आता 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.(Pradhan Mantri Crop Insurance Scheme 2024
15 जुलै 2024 पर्यंत राज्यात या योजनेअंतर्गत 1 कोटी 36 लाख विमा अर्जाद्वारे साधारण 90 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. गतवर्षी म्हणजेच खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यात पिक विमा अर्ज संख्या 1 कोटी 70 लाख होती व विमा संरक्षित क्षेत्र 1 कोटी 13 लाख हेक्टर होते. या योजनेत 95 टक्के पेक्षा जास्त विमा अर्ज हे सामूहिक सुविधा केंद्राच्या (कॉमन सर्विस सेंटर ) माध्यमातून भरण्यात येतात. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा कमी असणे, त्याचा वेग कमी असणे, त्याचबरोबर शासनाने नव्याने सुरु केलेली ‘लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत अर्ज देखील सामूहिक सुविधा केंद्र (कॉमन सर्विस सेंटर) यांच्या माध्यमातून भरण्यात येत आहे.
त्यामुळे पीक विमा व लाडकी बहीण योजना असे दोन्ही अर्ज कॉमन सर्विस सेंटर यांच्या माध्यमातून भरावयाच्या असल्याने त्या यंत्रणेवर ताण आल्याने अनेक शेतकरी पीक विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे शेतक-यांना दिलासा देण्यासाठी तसेच जे शेतकरी पीक विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत, त्यांना या योजनेत सहभाग घेता यावा, या हेतूने राज्य शासनाने 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला होता. सदर प्रस्तावास केंद्र शासनाने अनुमती दिली असून योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2024 असा आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंढे यांनी केले आहे.