सनफ्लॅग कंपनीत स्फोट, ३ कामगार जखमी

0

भंडारा Bhndra : भंडारा शहराजवळील वरठी येथे असलेल्या  Sunflag company सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या स्फोटात तीन कामगार गंभीररित्या होरपळले असून त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी काम करत असलेल्या इतर आठ कामगारांनाही दुखापत झाल्याची माहिती असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
मंगळवारी पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास कंपनीतील एलएचएफ युनिटमधील हिटींग फर्नेसमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटमागील कारण स्पष्ट झालेले नाही. यात जखमींमध्ये तंत्रज्ञ नामदेव झंझाड, अभियंता सागर गभने व कंत्राटी कामगार हटवार यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की त्यामुळे आसपासचा परिसरही हादरला व घबराट निर्माण झाली. या अपघातात कंपनीतील साहित्याचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही.