

नागपूर(Nagpur), 9 जुलै-स्वरवेद फाउंडेशन नागपूर तर्फे आषाढी एकादशी निमित्त ‘बोलावा विठ्ठल’ हा अभंगवाणीचा कार्यक्रम सोहम हॉल, सिनियर सिटीझम होम, उत्तर अंबाझरी रोड,नागपूर येथे सादर करण्यात आला. गायिका स्वर्गीय कुसुम चाफळे यांच्या स्मृतींना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला होता.
कार्यक्रमात सारेगम फेम गायक हिडोल पेंडसे व स्मृती मुलमुले यांनी एकापेक्षा एक सरस अशी सुप्रसिद्ध अभंग, भक्तीगीते सादर केली. यामध्ये तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी, कानडा राजा पंढरीचा, कुणी हरी म्हणा, खेळ मांडियेला वाळवंटी बाई इत्यादींचा समावेश होता. गायकांना साजेशी तबला संगत रवी सातफळे, हार्मोनियम संगत प्रवीण देशपांडे व लघुवाद्य संगत आदित्य पेशवे यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्या उज्ज्वला अंधारे यांनी केले तर कलावंताचे स्वागत मोहन सरवटे यांनी केले. सोहमच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा मनोहर यांनी कलावंताचा सत्कार केला. सोहमचे जेष्ठ नागरिक आणि रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला आदित्य अनघा मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह बँकेचे सहकार्य लाभले.